कुकडी कालवा पट्ट्यात कांदा लागवड लांबणीवर | पुढारी

कुकडी कालवा पट्ट्यात कांदा लागवड लांबणीवर

निघोज : पुढारी वृत्तसेवा :  पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालवा पट्ट्यात कांदा लागवड उशिरा सुरू झाली आहे. गतवर्षीचा कांदा अद्यापि बाजारपेठेत न गेल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिवाळीच्या दरम्यान जवळपास कांदा लागवड पूर्ण होत असते. मात्र, यावर्षी अतिवृष्टीमुळे कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याचे नगदी पीक घेण्यासाठी शेतकर्‍यांना चार साडेचार महिन्याचा कालावधी लागतो. उत्पन्नाच्या दृष्टीने हे पीक शेतकर्‍यांना परवडते.

मात्र, गतवर्षीचा विचार केला, तर कांदा या पिकाला एप्रिल ते सप्टेंबरअखेर पर्यंत किलोला 15 ते 18 रुपये भाव मिळाल्याने शेतकरी पूर्णपणे तोट्यात गेला. साधारण कांदा पीक घेण्यासाठी शेतकर्‍यांना हेक्टरी लाख ते दीड लाख रुपये खर्च येतो. यावर्षी भावच नसल्याने अतिवृष्टी, खराब हवामानामुळे कांदा चाळीतील बराचसा कांदा खराब झाला. त्यातच भाव नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
सध्या कांद्याला वीस ते पंचवीस रुपये किलो भाव असला, तरी बहुतांश माल खराब झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात आहे.

शेतकर्‍यांना सरकारने प्रतिहेक्टरी दोन लाख रुपये तातडीचे व बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना सरकार पन्नास हजार रुपये देणार होते.ते सुद्धा अद्यापि मिळाले नाही. सरकारने तातडीने मदत करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Back to top button