तालुक्यात 67 हजार जनावरांचे लसीकरण

तालुक्यात 67 हजार जनावरांचे लसीकरण
Published on
Updated on

नगर तालुका : शशी पवार :  संपूर्ण राज्यात लंपी आजाराने थैमान घातले असताना नगर तालुक्यात 555 जनावरे लंपी आजाराने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच 30 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात आजपर्यंत 66 हजार 911 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. नगर तालुक्यात लंपी आजाराची एन्ट्री झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तत्काळ सतर्क होत जनजागृती व लसीकरणावर भर दिला. तालुक्यात श्रेणी एकचे पाच व श्रेणी दोनचे 14 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. आगडगाव येथे जिल्हा परिषदेच्या वतीने श्रेणी दोनचा दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे. असे एकूण वीस पशुवैद्यकीय दवाखाने तालुक्यात अस्तित्वात आहेत.

गाय प्रवर्गातील जनावरांची एकूण संख्या 77 हजार 944 एवढी आहे. म्हशींमध्ये हा आजार आढळून आला नसल्याने त्यांचे लसीकरण करण्यात आले नाही. नगर तालुक्यात सर्वप्रथम माथणी येथे लंपी आजाराचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. तालुक्यात एकूण 17 गावे लंपी आजाराचे केंद्रबिंदू बनले होते. त्यामध्ये 555 जनावरे बाधित आढळून आले आहेत. त्यातील 237 जनावरे बरे झाले असून 288 जनावरांवर उपचार सुरू आहेत. तीस जनावरांचा मृत्यू झाला आहे. लंपीबाधीत सर्वाधिक जनावरे वाळकी कक्षात आढळून आले आहेत. लंपी बाधित संसर्ग आढळलेल्या गावातील पाच किलोमीटर परिसरात लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले.

लंपी आजाराचा संसर्ग पाहता तालुका प्रशासन अलर्ट झाले होते. तालुका पालक अधिकारी म्हणून रेश्मा होजगे यांची नियुक्ती करण्यात आली होती. गटविकास अधिकारी, पंचायत समिती पशुधन विकास अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पशुधन विकास अधिकारी व दहा पर्यवेक्षक, कर्मचारी तसेच खासगी लोकांच्या सहकार्याने आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात लंपी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सुनील तुंभारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय कुमकर, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. निर्मला धनावडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल कराळे, डॉ. मुकुंद राजळे, डॉ. राजेंद्र शेटे, डॉ. अनिल गडाख, डॉ. संतोष गायकवाड यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.

लंपी केंद्रबिंदू : बाधित- मृत्यू
लंपी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात लंपी आजार नियंत्रणात आहे, तरी पशुपालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. लंपी आजाराचा प्रसार होणार नाही यासाठी सर्व पशुपालकांनी खबरदारी घ्यावी. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहेत.
            – डॉ. निर्मला धनावडे, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती

 

लंपी आजार गोमाशा, गोचिड, डास यांच्यापासून पसरत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपले गोठे स्वच्छ ठेवावेत. डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी. राहिलेल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. जनावरांमध्ये आजाराचे लक्षणे दिसताच पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
                            – डॉ. अनिल कराळे, पशुधन विकास अधिकारी, जेऊर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news