भारत जोडो यात्रा उद्या येणार महाराष्ट्रात : आ. थोरात | पुढारी

भारत जोडो यात्रा उद्या येणार महाराष्ट्रात : आ. थोरात

संगमनेर शहर/ संगमनेर: पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचा दौरा करून आलेली भारत जोडो यात्रा तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातून सोमवारी महाराष्ट्रात येणार आहे. यानिमित्त नांदेड व शेगाव या दोन ठिकाणी राहुल गांधी यांच्या जाहीर सभा होणार असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, भारत जोडो यात्रेचे समन्वयक, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाच्या कानाकोपर्‍यातून फिरून आलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन होणार आहे.

राहुल गांधी यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने तेथे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला व बुलढाणा या मार्गावरून या यात्रेचा प्रवास असेल. नांदेड जिल्ह्यात चार मुख्य ठिकाणी या यात्रेचा मुक्काम असेल. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे विशेष लक्ष ठेवून आहेत. यात्रा एक दिवस कळंबोली येथे मुक्कामी थांबणार आहे. शेगावच्या सभेपूर्वी राहुल गांधी गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. दरम्यान, राज्यात येणार्‍या यात्रेच्या संपूर्ण प्रवासाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आ. थोरात यांनी दिली.

शरद पवार येणार.., उद्धव ठाकरेही सकारात्मक!
काँग्रेसच्या भारत छोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 8 व 9 नोव्हेंबरला सहभागी होणार आहेत तर उद्धव ठाकरे हे देखील सकारात्मक आहेत. त्यांच्या पक्षातील काही नेते, कम्युनिस्ट पक्ष व विविध स्वयंसेवी संघटना सहभागी होणार आहेत.

राज्यातील यात्रेची तयारी पूर्ण..!
भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी यांची पहिली सभा नांदेड येथे 10 तर दुसरी सभा शेगावमध्ये 18 नोव्हेंबरला होणार आहे. राज्यातील यात्रेच्या संपूर्ण प्रवासाची तयारी पूर्ण झाली आहे.

 

काँग्रेस पक्ष हा देश हिताच्या विचार सरणीशी जोडला आहे. राज्य घटनेची बांधिलकी असलेला हा पक्ष आहे. याविचारसरणीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने निश्चितच ताकद मिळणार आहे.
                      – आ. बाळासाहेब थोरात, भारत जोडो यात्रेचे समन्वयक.

Back to top button