श्रीगोंद्याच्या राजकीय भूकंपामागे ‘विखे-शिंदे’? काँग्रेसचे नगरसेवक भाजपसोबत

श्रीगोंद्याच्या राजकीय भूकंपामागे ‘विखे-शिंदे’? काँग्रेसचे नगरसेवक भाजपसोबत
Published on
Updated on

अमोल गव्हाणे : 

श्रीगोंदा : नगरपालिकेच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले. केंद्रात, राज्यात एकमेकांच्या विरोधात असणारी भाजप व काँगेस श्रीगोंद्यात; मात्र सत्तांतर घडविण्यासाठी एकत्र आली. ही राजकीय घडामोड ऐतिहासिक ठरली. त्यात अविश्वास ठरावाची संपूर्ण यंत्रणा खासदार डॉ. सुजय विखे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आजपर्यंतच्या घडामोडी पाहता श्रीगोंदा तालुक्याच्या उद्याच्या राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याचे स्पष्ट संकेत यारून दिले गेले.

नगराध्यक्षापदी जनतेतून निवडून आलेल्या शुभांगी पोटे यांनी व नगरसेवक मनोहर पोटे यांनी नगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेत इतर नगरसेवकांचे महत्त्व अदखलपात्र करून टाकले. नगरसेवकपद नामधारी असल्याची भावना अन्य नगरसेवकामध्ये झाली. प्रभागात दिवा लावण्यासाठी नगराध्यक्षाची परवानगी लागत असल्याने नगरसेवक हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. या संपूर्ण तक्रारींचा पाढा नगरसेवकांनी नेत्यांकडे वाचून दाखवला होता. त्यानंतर नेते मंडळींनी पोटे यांना नगरसेवकांना विश्वासात घेण्याबाबत सूचना केल्या होत्या; मात्र तरीही मनमानी सुरूच असल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांमधून होत राहिला.

नंतरच्या कालावधीमध्ये नेते मंडळींची कामेही मार्गी लागेनाशी झाली. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून मनोहर पोटे यांना गटनेते पदावरून हटविण्यात आले. हे सगळे करण्यात प्रमुख नेतेमंडळींनी छुपा पाठींबा देत सगळे राजकीय पाठबळ उभे केल्याचे उघड सत्य.
एकीकडे काँगेसचे नेते राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' अभियानातून भाजपच्या विरोधात रान पेटवले आहे. राज्यातही काँग्रेसचे नेते भाजपच्या विरोधात टोकाची भूमिका घेत असताना श्रीगोंदा तालुक्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतेय. भाजप-काँगेस एकमेकांचे विरोधी पक्ष एकत्र येऊन काँग्रेसच्या नगराध्यक्षा विरोधात अविश्वास ठराव दाखल करतात, ही बाब तालुक्याच्या पक्षीय पातळीवर धक्कादायक म्हणावी लागेल.

विशेषकरून आगामी निवडणुकांमध्ये शहरात त्याचे दूरगामी परिणाम दिसू शकतात. काँग्रेसच्या ज्या पाच नगरसेवकांनी काँग्रेसच्या नगराध्यक्षा हटविण्यासाठी जो सुरुंग लावला त्या नगरसेवकांची उद्याची भूमिका काय असेल, हा आज तरी अनुत्तरीत प्रश्न आहे. मनोहर पोटे यांचे शहरात वाढते राजकीय वजन लक्षात घेऊन भाजपने काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात नगराध्यक्षा पोटे यांना हटविण्याची नामी संधी असल्याने आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाने हा प्रस्ताव लगेच मान्य केला.
आता, अविश्वास ठराव दाखल करण्यापाठीमागच्या कारणांचा राजकीय पटलावर वेगवेगळे तर्कविर्तक काढले जात आहेत.

भाजपला आयती संधी
नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी काँगेसच्या नेत्यांसह नगरसेवकांनीही कंबर कसली. कोणत्याही परिस्थितीत अविश्वास ठराव दाखल करायचा, या भूमिकेतून नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. भाजपने आयती संधी असल्याचे लक्षात घेऊन तत्काळ सहमती दर्शवली. अर्थात या सगळ्या घडामोडी घडत असताना काही नगरसेवकांनी शिंदे गटाशी संपर्क साधून आगामी राजकीय भूमिकेची बांधणी करून घेतली. त्यांनीही या संपूर्ण प्रक्रियेत लक्ष घालण्याची तयारी दर्शविल्याने अविश्वास ठराव दाखल करण्याच्या घडामोडींनी वेग घेतला.

…त्यावर खलबतं सुरू
तूर्तास दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन पोटे हटावचा नारा दिला अन् अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर आगामी निवडणूक कशी लढणार, दोन्ही एकत्र राहून निवडणुकीला सामोरे जाणार की, आमने-सामने लढणार असे प्रश्न अद्यापि अनुत्तरित आहेत.

नगरसेवक सहलीला
जिल्हाधिकार्‍यांच्यासमोर अविश्वास ठराव अर्ज दाखल केल्यानंतर 16 नगरसेवक सहलीला रवाना झाले. लोणीप्रवरा येथे आगामी दिशा काय असेल यावर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news