अकोले नगर पंचायतमध्ये रंगतो आहे मुख्याधिकारी विरुद्ध नगरसेवक असा सामना

अकोले नगर पंचायतमध्ये रंगतो आहे मुख्याधिकारी विरुद्ध नगरसेवक असा सामना
Published on
Updated on

अकोले पुढारी वृत्तसेवा : अकोले नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांना प्रशासक काळातील गैरव्यवहार व नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा तसेच नगरसेवकांना विश्वासात न घेण्याचे प्रकरण भोवले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची एक समिती गठीत केली आहे. या समितीने अकोले नगर पंचायतमध्ये येऊन मुख्याधिकारी जगदाळे यांची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे वादग्रस्त ठरलेले मुख्याधिकारी जगदाळे हे चौकशीच्या फेऱ्यात गुंतणार की सही सलामत बाहेर पडणार,याकडे अकोले शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

अकोले नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांचा मनमानी पध्दतीने कारभार सुरू असून नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा व इतर नगरसेवक यांना विश्वासात न घेताच मुख्याधिकाऱ्यांचा एककलमी कारभार सुरू आहे. यासारख्या अनेक लेखी तक्रारी नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी व इतर नगरसेवकांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन केल्या होत्या. या समितीने मंगळवार पासून अकोले नगर पंचायतीत येऊन मुख्याधिकारी जगदाळे यांच्या कारभाराची तपासणी सुरू केली आहे.

नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी सुचविलेल्या विविध सूचना व समस्यांची मुख्याधिकारी विक्रम जगदाळे दखल घेत नाही. विशेष म्हणजे काही ठराविक ठेकेदारांना मनमानी पध्दतीने कामे देत लाखो रुपयांचे बिल ही मुख्याधिकाऱ्यांनी संबंधितांना अदा केल्याचा आरोप नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केला आहे. अकोले नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ साठी भाडोत्री मंडप व्यवस्था,खुर्च्या,स्टेज, बॅरिकेटिंग व लायटिंगचे काम न्यू महालक्ष्मी मंडप अँड लाईट डेकोरेशन या फर्मला देण्यात आले होते. या फर्मला अव्वाच्या सव्वा बिले अदा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाच रुपये दराने मिळणाऱ्या खुर्चीचे भाडे ५० रुपये दराने अदा केले असल्याचे बिलाच्या पाहणीवरुन उघडकीस आले आहे.

प्रचलित भाड्यापेक्षा अधिक बिल अदा करून मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी शासनाचे व नगर पंचायतीचे आर्थिक नुकसान केले आहे. तसेच अकोले नगर पंचायत हद्दीत भरणाऱ्या आठवडे बाजारातील करपावती मधील गैरव्यवहार नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या निदर्शनास आला असून हा प्रकार मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. या प्रकरणाची मुख्याधिकारी जगदाळे यांनी साधी दखल ही घेतली नाही. त्यामुळे नगर पंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच अकोले शहरात सुरू असलेल्या बांधकामांनाही मुख्याधिकारी जगदाळे हे मनमानी पध्दतीने नोटिसा देत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी,आर्किटेक्ट व इंजिनिअर यांचे लागेबांधे असल्याचा संशय नगरसेवकांना आला.

अकोले शहरातील सौरभ संतोष भळगट,शांताराम दगडू हासे, विठोबा गणपत आभाळे, सोमनाथ निवृत्ती काळे,प्रतीक सुहास कोटकर,रमेश बाबुराव जाधव,विकास दिनकर साबळे,द्रुपदा वाजे यांच्यासह अनेक बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा मुख्याधिकारी यांनी दिल्या आहे. या नोटीसांवर जनतेत लोकप्रतिनिधींवर रोष निर्माण व्हावा म्हणून नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांच्या पत्रांचा संदर्भ जाणीवपूर्वक जोडण्यात आला आहे. याखेरीज पानसरवाडी येथील टेकडीवर वृक्षलागवड करून संगोपन करणे,या कामाच्या ठेकेदाराला वृक्षसंगोपन न करताही बिल अदा केले आहे. यासारख्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आल्या आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पाच अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे.

या समितीने अकोले नगर पंचायतमध्ये येऊन मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या कारभाराची चौकशी सुरू केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून अकोले नगर पंचायतमध्ये विविध घडामोडी घडत असून मुख्याधिकारी विक्रम जगदाळे हे आपली बदली करून घेण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती दैनिक पुढारीला समजली आहे. चौकशी समितीने मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांची निःपक्षपाती चौकशी करणे गरजेचे आहे. जगदाळे यांनी प्रशासक काळात लाखो रुपये गैरमार्गाने कमवले असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या अकोले नगर पंचायतमध्ये मुख्याधिकारी विरुद्ध नगरसेवक असा सामना रंगला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news