

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : एका ऊसतोड कामगाराच्या कोपीत झोपलेल्या बालकावरती एका नरभक्षक बिबट्याने प्राणघातक हल्ला करत त्याला गंभीररीत्या जखमी केल्याची दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा मंदिर परिसरात घडली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा परिसरातील लक्ष्मीमाता मंदिराजवळ जळगाव येथून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांची २० कुटुंबं राहतात.
गुरुवारी हे मजूर आपल्या कोप्यामध्ये झोपलेले असताना रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अचानक अंधाराचा फायदा घेत बिबट्याने झोपलेल्या विरु अजय पवार (वय, ३ ) या बालकाला जबड्यात पकडून घेऊन शंभर ते दिडशे फुट ओढत नेले. त्यावेळी बालकाच्या ओरडण्यामुळे परिसरात असलेले लोक जागे झाले. त्यांनी जीवाची पर्वा न करता बिबट्याचा पाठलाग करून बालकाची सुटका केली. बिबट्याने त्या चिमुकल्याच्या मानेवर खोलवर जखमा केल्यामुळे जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला.
त्याला तात्काळ लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे त्याला लागलीच अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.