राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा अॅक्टीव्ह झाल्याचे दिसून आले. दै. 'पुढारी' मध्ये दुचाकी चोर व वाढत्या गुन्हेगारीबाबत बातमी प्रसारित झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरू केल्याचे चित्र आहे. चोरीच्या चार दुचाक्यांसह तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्यानंतर राहुरी पोलिसांनी दोन लाख रूपयांची गावठी दारू निर्मित करणार्यांवर कारवाई केली आहे. तसेच अवैध मटका व जुगार अड्डा चालविणार्यांवर कारवाई केली आहे.
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांसह पोलिस उपनिरीक्षक सज्जन नर्हेडा, पेालिस हवालदार साईनाथ टेमकर, सुशांत दिवटे, राधिका कोहकडे, संतोषकुमार राठोड, जयदिप बडे, अमोल पडोळ, सचिन ताजणे, आजिनाथ पाखरे आदींनी कारवाई हाती घेताना धामेारी (ता. राहुरी) येथे दोन ठिकाणी अवैध गावठी दारू तयार करीत असतानाच छापेमारी केली. यामध्ये हजारो रुपये किंमतीची गावठी हातभट्टी दारू व कच्चे रसायन पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आले.
रंभाबाई तारांचद गिर्हे यांच्या गावठी दारू तयार करीत असताना कारवाई झाली. त्यांच्याकडे गावठी दारू व कच्चे रसायन सापडले. त्यानंतर राजेंद्र मच्छिंद्र गिर्हे (रा. धामोरी फाटा ता. राहुरी) या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याकडील 75 हजार रूपये किंमतीचे कच्चे रसायन व गावठी दारू सापडली. पोलिस प्रशासनाने कच्चे रसायनाचे नमुने ताब्यात घेत गावठी दारू नष्ट केली. सुमारे 2 लक्ष रूपयांची दारू धामोरी फाट्यावर आढळून आल्याने राहुरी तालुक्यात निर्मित होत असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर हद्दीमध्ये पोलिस प्रशासनाने धाड टाकत अवैध धंदे करणार्यांवर कारवाई केली आहे. जुगार प्रतिबंधक कारवाई करताना तिघांवर गुन्हे दाखल करताना पोलिसांनी 61 हजार 245 रूपयांचा मुद्देमाल जप्त केल आहे. दारूबंदीच्या 11 ठिकाणावर कारवाई करताना 2 लक्ष 43 हजार 80 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध धंद्यांचा कायमचा बंदोबस्त करावा
यापूर्वी पोलिस प्रशासनाने अनेक ठिकाणी कारवाया केल्या. परंतु कारवाईच्या दुसर्याच दिवशी गावठी दारू विक्री, मटका पेढी व जुगार अड्डे सुरू झाल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे मागील कारवाईप्रमाणे आताही केवळ कारवाईचा फार्स न करता अवैध धंदे करणार्यांचा कायमचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी होत आहे.
गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्यासाठी सर्वसामान्यांचे सहकार्य महत्वाचे असते. कोणत्याही गुन्हेगारीबाबत किंवा दुचाकी चोरीच्या तडजोडीबाबत जी काही माहिती असेल ती मला कळवा. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत कठोर कारवाई केली जाणार असल्याची ग्वाही पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.
– प्रताप दराडे (पोलिस निरीक्षक, राहुरी)