

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : बेकायदा मुरूम वाहतूक करणारा डंपर पळवून नेल्याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात दोघा विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बेलपिंपळगाव तलाठी माधुरी रायपेल्ली यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी यात म्हटले की, नेवासा महसूल विभागाच्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक विरोधी पथकातील इतर अधिकारी बेलपिंपळगावकडे जाताना बेलपांढरी फाट्याजवळ मुरुम वाहतूक करतांना मिळून आलेल्या डंपरवर कारवाई करत ताब्यात घेतले.
नेवासा तहसील कार्यालयात नेताना बिगर नंबरच्या डंपर चालक अनोळखी व्यक्ती व डंपर मालक लक्ष्मण नाथा पंडित (रा. बहिरवाडी, ता. नेवासा) यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करून कोतवाल अशोक शिंदे याना हिसकावून घेवून रस्त्यावर मुरुम खाली करून पकडण्यात आलेला ढंपर पळवून नेला. डंपर मालक लक्ष्मण नाथा पंडित व अनोळखी व्यक्ती, अशा दोघा विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.