पारनेर : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद ; आठ महिन्यांनी सापडला खुनी | पुढारी

पारनेर : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद ; आठ महिन्यांनी सापडला खुनी

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  पारनेर तालुक्यात आठ महिन्यापूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, आरोपीस अटक केली असल्याची माहिती गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली. पारनेर तालुक्यातील निघोज येथे 23 फेब्रुवारी रोजी हॉटेल मंथनधील वेटर मन्सूर अन्सारी (रा. उत्तर प्रदेश) यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने गळ्यावर वार करून ठार मारून पाडळी आळे (ता.पारनेर) गावाच्या शिवारात कळस गावाकडे रस्त्याच्या कडेला शेतात मृतदेह टाकून दिला होता. आठ महिने या गुन्ह्याचा तपास लागला नव्हता. .

त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी आढावा घेऊन या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना दिले होते. त्यानुसार विशेष पथक रवाना करण्यात आले. पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी वेशांतर करून सापळा लावून थांबलेले असताना, त्यांना एक संशयित व्यक्ती रस्त्याने पायी येताना दिसला. मात्र, पोलिस पथकाची चाहूल लागताच तो पळून जाऊन लागला. पथकाने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.

पोलिस पथकाने त्याचे नाव व पत्ता विचारला असता, त्याने सुरुवातीला उडवडीची उत्तरे दिली. त्यानंतर कसून चौकशी केली असता, त्याचे नाव राजू उर्फ प्रभाकर औटी (वय 46) असे असल्याचे त्याने सांगितले. सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीस पारनेर पोलिस ठाण्यात हजर केले असून, पुढील कार्यवाही पोलिस निरीक्षक घनश्याम बळप हे करत आहेत.

विशेष पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, उपनिरीक्षक सोपान गोरे, साहाय्यक उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, कॉन्स्टेबल संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, विशाल दळवी आदींचा समावेश होता.

Back to top button