ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी ते काढणार मोहटादेवी ते मातोश्रीपर्यंत मशाल यात्रा | पुढारी

ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी ते काढणार मोहटादेवी ते मातोश्रीपर्यंत मशाल यात्रा

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : मोहटा देवी ते मातोश्री अशी मशाल यात्रा काढत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय पाथर्डी तालुक्यातील शिवसेनेच्या कट्टर शिवसैनिकांनी घेतला असून, या मशाल यात्रेत तालुक्यातील तीनशे शिवसैनिक सहभागी होणार आहेत. या संदर्भात शिवसैनिकांनी पाथर्डीच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस नवनाथ चव्हाण, सुरेश हुलचुते, नवनाथ उगलमुगले, नवनाथ वाघ, सचिन नागापुरे, नंदकुमार डाळिंबकर, सतीश वारंगुळे, चंद्रकांत शेळके, महादेव रहाटे, विकास दिनकर, शायद पठाण,भारत घोडके आदी शिवसैनिक या बैठकीस उपस्थित होते.

मशाल यात्रेचे नेतृत्व ज्येष्ठ शिवसैनिक नवनाथ चव्हाण करणार आहेत. चव्हाण म्हणाले, काही गद्दार खोके घेऊन गुवाहाटीला पळून गेले असले, तरी सुद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक आजही जागेवर आहेत. राज्यात काही गडबड झाली असली तरीही या तालुक्यात आजही सर्वजण एकदिलाने उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. पडत्या काळात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ देण्यासाठी आम्ही मोहटा ते मातोश्री अशी पायी मशाल यात्रा काढत असून, या यात्रेत जवळपास तीनशे शिवसैनिक सहभागी होणार आहेत. यासंदर्भात गावागावात जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहोत. नियोजन झाल्यानंतर मशाल यात्रा मातोश्रीच्या दिशेने निघणार आहे.

मशाल जशी पेटते, तशी शिवसैनिकांच्या मनामध्ये शिवसेना प्रमुख ठाकरे यांच्या विषय असलेला आदर तो ज्वलंतपणे देवता आहे. त्याचा प्रत्येक आदेश आम्हा शिवसैनिकांसाठी अंतिम असेल, आम्ही सर्व कट्टर शिवसैनिक त्यांना पाठिंबा दर्शनासाठी यात्रा काढत असल्याचे ते म्हणाले.

Back to top button