श्रीगोंदा : ऊसतोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा

अमोल गव्हाणे :
श्रीगोंदा : राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम जोरात सुरू झाला आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मुकादमांनी ऊस वाहतूक करणार्या अनेक ट्रॅक्टरमालकांना लाखो रुपयांचा गंडा घालून मुकादम फरार झाल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याने लाखोंची गुंतवणूक करणार्या वाहनमालकांचा जीव टांगणीला लागला आहे. श्रीगोंदा तालुक्यात दोन खासगी व दोन सहकारी, असे चार साखर कारखाने आहेत. या कारखान्यांकडे ऊसतोडणीसाठी हजारो टोळ्या येतात. बीड, कन्नड, चाळीसगाव, जळगाव, नांदेड, औरंगाबाद येथून ऊसतोडणी कामगार तालुक्यात येतात. आधुनिक युगात ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर आले, तरी त्याला काही मर्यादा आहेत. त्याचबरोबर ऊसउत्पादक शेतकरी ऊसतोडणीसाठी ऊस कामगारांनाच प्राधान्य देत असल्याने ऊसतोडणी कामगार, ऊस वाहतूकदार कारखाना यंत्रणेतील महत्त्वाचे घटक मानले जातात.
ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी अनेक ऊस वाहतूकदार (ट्रॅक्टर, ट्रकमालक) यांनी ऊस तोडणी मुकादमांशी संपर्क साधून ऊस टोळीसाठी मुकादमांना लाखो रुपयांची आगाऊ रक्कम दिलेेली असते. हा सर्व व्यवहार विश्वासावर चालत असल्याने पैशांची देवाण- घेवाण बिनदिक्कत सुरू असते. चालू वर्षी मात्र यातील काही ऊसतोडणी मुकादमांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक केल्याचे समोर आले.
तांदळी दुमाला येथील राजेंद्र भोस यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील ऊसतोडणी मुकादमास 18 लाख रुपये दिले. पैसे हातात पडताच काही कामांचा बहाणा करून ऊस तोडणी मुकादमाने तिथून धूम ठोकली. भोस यांनी त्या मुकादमाशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्याशी आजतागायत संपर्क झाला नाही. भोस यांची आर्थिक फसवणूक झाली.
ऊसतोडणी कामगारांच्या मुकादमांकडून फसवणूक झालेले भोस हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा पद्धतीने अनेक ऊस वाहतूकदार मालकांची फसवणूक झाली आहे. आता हे पैसे परत मिळतील की नाही? या विवंचनेत वाहनमालक आला दिवस पुढे ढकलत आहेत.