आमदार राजळेंचा फ्लेक्स ढाकणेंच्या दारात; नागरिकांमध्ये चर्चेचा विषय | पुढारी

आमदार राजळेंचा फ्लेक्स ढाकणेंच्या दारात; नागरिकांमध्ये चर्चेचा विषय

अमोल कांकरिया : 

पाथर्डी तालुका : पाथर्डी तालुक्याच्या राजकारणात एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक ढाकणे-राजळे सर्व जिल्ह्याला परिचित. त्यातच आता, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या दारात आमदार मोनिका राजळे यांनी मंजूर केलेली पाणी योजनेच्या कामाच्या अभिनंदनाचा फलक झळकत आहे. अ‍ॅड. ढाकणे पाथर्डी शहरातील एकलव्य शिक्षण संस्थेचे सचिव असून, या संस्थेच्या संस्कार भवन मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच राजळे यांचा अभिनंदनाचा फलक लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

पाथर्डी शहरातील देवी धामणगाव व माणिकदौंडीकडे जाणार्‍या रस्त्याच्या चौकामध्ये संस्कार भवन मंगल कार्यालय असून, हे मंगल कार्यालय एकलव्य शिक्षण संस्थेचे आहे. या संस्थेचे सचिव राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे आहेत.
पाथर्डी शहरवासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या पिण्याच्या पाण्याचे स्वतंत्र व नवीन पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानअंतर्गत 95 कोटी 85 लक्ष रुपयाची योजना मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पालकमंत्री तथा आमदार मोनिका राजीव राजळे यांच्या अभिनंदन व दीपावली, पाडव्याच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देणारा फलक लावण्यात आला आहे. यावर भाजप नेत्यांसह माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार मोनिका राजळे यांचे फोटो आहेत. तर, शुभेच्छुक म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके यांचे फोटो आहेत.

सर्व माजी नगरसेवक व माजी नगरसेविका पाथर्डी नगरपरिषद, सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, असे सर्वात शेवटी फ्लेक्स बोर्डवर नमूद करण्यात आले आहे.

कामांच्या मुद्यावरून दावेप्रतिदावे
महाविकास आघाडीच्या सत्तेचा काळात अनेक विकास कामाच्या मुद्यावरून अ‍ॅड. ढाकणे व आमदार राजळे यांच्यात दावेप्रति दावे आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. त्यात भगवानगड 45 गावांची पाणी योजना श्रेय वादाच्या भोवर्‍यात सापडली होती.

Back to top button