‘पदवीधर’साठी विखे-थोरातांची कसोटी ! | पुढारी

‘पदवीधर’साठी विखे-थोरातांची कसोटी !

संदीप रोडे : 

नगर : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू-मित्र नसतो, असे नेहमी म्हटले जाते, पण नगर जिल्ह्यातील विखे-थोरात त्याला अपवाद आहेत. दोघांचेही नेतृत्व बलाढ्य, प्रभावी तसंच शक्तीशाली. विद्यमान भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्याशी सूर कधी जुळले नाहीत. आता दोघांचे पक्ष वेगळेवेगळे झाल्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने दोघंही आमने-सामने ठाकणार असल्याचे चित्र आहे. दोघांच्याही नेतृत्वाचा कस लावणारी ही निवडणूक राज्याचे लक्ष वेधणारी ठरणार आहे.

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वीच निवडणूक होणार आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. पदवीधारक मतदार असलेल्या या मतदारसंघातील मतदार नोंदणीची मुदत 7 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानंतर मतदारयादी अंतिम करून केव्हाही निवडणूक जाहीर होऊ शकते. आ. तांबे यांना काँग्रेस-डीटीएफ संघटनेने उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना, राष्ट्रवादीने अजूनतरी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. उमेदवारी निश्चितीसाठी महाविकास आघाडीची बैठक नियोजीत आहे. मात्र त्यापूर्वीच आ. तांबे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघ तसा भाजपचा, पण प्रताप सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानंतर 2009 पासून तो काँग्रेसच्या ताब्यात आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी 2009 ची निवडणूक लढवित पहिल्यांदा काँग्रेसचा झेंडा फडकाविला. त्यावेळी आ. तांबेंना जेमतेम दहा महिन्याचा कालावधी मिळाला. 2010 मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून पुन्हा डॉ. तांबे निवडणुकीच्या मैदानात उतरले. 2010 ला भाजपचे प्रसाद हिरे व 2016 ला सुहास फरांदे यांचा पराभव करत डॉ. तांबे तिसर्‍यांदा पदवीधरचे आमदार झाले. यापूर्वीच्या निवडणुकीची सूत्रे आ. थोरात यांचेकडेच होती, महसूलमंत्री विखे पाटील हे तेव्हा काँग्रेसमध्ये होते.

आता मंत्री विखे पाटील हे भाजपचे मंत्री आहेत, तर थोरात काँग्रेसचे नेतृत्व करताहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघावर पुन्हा एकदा वर्चस्व मिळविण्याबरोबरच भाजपने आ. थोरातांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मंत्री विखे यांच्यावर जबाबदारी सोपवित मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विखेंच्या ‘प्रवरे’ची यंत्रणा मतदार नोंदणीसाठी सक्रीय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नववर्षारंभीच नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून हा मतदारसंघ मिळविण्यासाठी भाजपनेही तयारी चालविली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भाजपची तर माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसची जबाबदारी असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान महसूलमंत्री विखे आणि त्यांचे राजकीय पारंपरिक विरोधक माजी महसूलमंत्री आ. थोरात आमने-सामने येणार आहेत.

डॉ. विखेंचे नाव अग्रभागी
भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली नसली तरी मंत्री विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांचे नाव अग्रभागी असल्याची चर्चा आहे. धुळ्यातून धनराज विसपुते, शुभांगी पाटील हेही भाजपकडून इच्छूक असले तरी अंतिम निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीतच होणार असल्याचे समजते.

नगरचे धनंजय जाधवही रेसमध्ये
नगरचे माजी नगरसेवक धनंजय जाधव हेही भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या पत्नी सुप्रिया जाधव या नगर महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. धनंजय जाधव हे पूर्वीश्रमीचे आ. थोरात यांचे समर्थक, पण आता ते भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासोबत आहेत. त्यामुळेच भाजपकडील इच्छुकांमध्ये धनंजय जाधव यांचेही नगरमधून नाव पुढे आले आहे.

Back to top button