यंदाही पोलिसांना सुखाने फराळ नाहीच….. ! दिवाळीच्या सहा दिवसांत 175 गुन्हे | पुढारी

यंदाही पोलिसांना सुखाने फराळ नाहीच..... ! दिवाळीच्या सहा दिवसांत 175 गुन्हे

श्रीकांत राऊत/ सूर्यकांत वरकड :

नगर : दिवाळी म्हटलं की आनंद हर्ष उल्हासाचा सण. संपूर्ण देशात गोरगरीबापासून ते श्रीमंतापर्यंत दिवाळीचे मोठे अप्रूप असते. कोरोनानंतर यंदाची दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात झाली. मात्र, पोलिसांची दिवाळी पोलिस ठाण्यातच गेली. वसुबारस ते भाऊबीजेपर्यंत जिल्ह्यात चोरी, घरफोडी, रस्तालूट, दुखापत विनयभंग, बलात्कार, अपघात, खंडणी, खुनाचा प्रयत्न करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, अपहरण अशा गंभीर स्वरूपाचे 175 गुन्हे घडले आहेत. या गुन्ह्यांच्या तपासाच्या ताणात पोलिसांना दिवाळी फराळाचा अस्वाद ऑनड्युटीच घ्यावा लागला.

दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी व गोडधोड पदार्थाची मेजवानी असते. कोरोनानंतर पहिल्यांदाच दिवाळी निर्बंधमुक्त धुमधडाक्यात साजरी झाली. अतिवृष्टीत चिंताग्रस्त शेतकर्‍यांनी पोटाला चिमटा घेऊन मुलांना कपडे आणि फटाके घेतले. दिवाळीच्या काळात नोकरदारांच्या खिशात पैसा खुळखुळत असल्याने बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. दोन हजार नवीन वाहने रस्त्यावर आली. काहींनी सोने-चांदी खरेदी केले. मात्र, दिवाळीतील पाच ते सहा दिवस गुन्हेगारांनी उच्छांद मांडल्याची आकडेवारीही समोर आली. दिवाळी सणासाठी शहरातील नागरिक घर बंद करून गावाकडे गेल्याने तीच संधी गुन्हेगारांनी साधत घरफोड्यातून लाखोंचा ऐवज लंपास केला.

कुठं फटाके फोडण्यावरून वाद तर, कुठे गावाकडे जाणार्‍या जोडप्याला रस्त्यात अडवून लुटले गेले. दिवाळीच्या आधी विविध कार्यालयात रोकड घेऊन जाणार्‍याला रस्त्यात अडवून लुटले गेले, तर शेतात वस्ती करून राहणार्‍या नागरिकांच्या घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले. दिवाळीसाठी शहरातून गावखेड्यात आलेल्यांमध्ये जमिनीच्या कारणावरून हाणामार्‍या झाल्याच्या घटनाही घडल्या. हे वाद पोलिसांत पोहचल्यानंतर त्याच्या तपासात पोलिसांना ऐन सणासुदीत ‘बंदोबस्त’ करावा लागला.

दिवाळीत गुन्हेगारी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊनही वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष ठेवून असल्याने पोलीस निरीक्षकांपासून ते बीट अंमलदारापर्यंत सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या. काहींच्या सुट्ट्या रद्द झाल्या तर काहींना दिवाळीनंतरचा वादा दिला गेला. दाखल झालेल्या गुन्हयांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

 

दिवाळीच्या काळात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्या गुन्ह्यांच्या शोधासाठी विशेष पोलिस पथकांची नेमणूक केली आहे. प्रत्येक गुन्हा घडकीस आणण्यासाठी पोलिस दल प्रयत्नशील आहे. कमी मनुष्यबळ असतानाही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्यावर भर देण्यात येईल.
                                          – राकेश ओला, पोलिस अधीक्षक, नगर

दाखल गुन्हे असे
बसुबारस (दि. 21) 41
धनत्रोदिशी (दि. 22) 32
रविवार (दि.23) 2
लक्ष्मीपूजन (दि. 24) 18
मंगळवार (दि. 25) 31
भाऊबीज (दि. 26) 24

अपुरे मनुष्यबळ
जिल्ह्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या पाहता पोलिस ठाण्याची संख्या वाढवून कर्मचार्‍यांची संख्या वाढविणे अत्यावश्यक आहे. खर्डा व मिरजगाव ही दोन पोलिस ठाणी वगळता देवळाली प्रवरा, टाकळी ढोकेश्वर, बोधेगाव, तिसगाव, केडगाव, सावेडी आदी पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. पोलिस ठाणी कमी, त्यातच कर्मचार्‍यांची संख्या अपुरी, त्यामुळे ऐन दिवाळीत पोलिस कर्मचार्‍यांची धावपळ दिसून आली.

जुगार्‍यांना पकडले
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामान्यावर सट्टा लावणार्‍या एकाला कोतवाली पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून मोबाईल व सट्टा लावण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. ऐन दिवाळीच्या दिवशी कोतवाली पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतले.

तरुणाच्या बचावासाठी पोलिस सरसावले
ऐन दिवाळीच्या अगोदर सीना नदीला आलेल्या पुरात नगर-कल्याण रस्त्यावरील पुलावरून तरुण वाहून गेला. त्या तरुणाच्या शोधासाठी पोलिस दोन दिवस प्रयत्न करीत होते.

श्रीरामपुरात विवाहितेचा खून
श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक सहामध्ये आई-वडिलांना भेटण्यासाठी पत्नीने माहेरी जाऊ का, असे विचारल्याच्या रागातून पतीने तिला बेदम मारहाण केली. विवाहिता गर्भवती असल्याने तिच्या पोटात मार लागला आणि ती चक्कर घेऊन खाली पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी पाडव्याच्या दिवशी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

सणासुदीत चार खून
धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जामखेड पोलिस ठाण्यात, तर वसुबारसच्या दिवशी पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचे गुन्हे नोंदविले गेले. दिवाळी पाडव्याला शिर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.

Back to top button