कार्यसम्राट खासदार खड्डा, कार्यसम्राट आमदार खड्डा... ! खड्ड्यांना चक्क लोकप्रतिनिधींची नावे देत चिमुकल्यांचा टाहो | पुढारी

कार्यसम्राट खासदार खड्डा, कार्यसम्राट आमदार खड्डा... ! खड्ड्यांना चक्क लोकप्रतिनिधींची नावे देत चिमुकल्यांचा टाहो

शेवगाव तालुका : वृत्तसेवा :  कार्यसम्राट खासदार खड्डा…कार्यसम्राट आमदार खड्डा…थांबा ऽऽ…थांबा ऽऽ..ही काही रस्त्यांची किंवा चौकांची नावे नाहीत. ही आहेत लहानग्या चिमुकल्यांनी दिलेली शेवगावमधील खड्ड्यांची नावे. अश्चर्यच ना..होय खड्डेमुक्त रस्ते आमचा अधिकार…आम्ही शेवगावकर….खड्ड्यांमुळे आम्ही झालो हैराण…असा टाहो या चिमुकल्यांनी रस्त्यावर उतरत फोडला आहे. त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शेवगाव शहरासह तालुका हद्दीतील राज्यमार्गाबाबत चिमुकल्यांनी आक्रमक होत टाहो फोडला. शहरातून रस्त्यांवर उरलेले चिमुकले पाहून सर्वच अचंबित झाले होते.

यावेळी या चिमुकल्यांच्या हाती विविध फलक झळकत होते. यामध्ये खड्डा मुक्त रस्ता आमचा अधिकार, रस्त्यांवरील खड्डे त्वरित दुरुस्त करावे, खड्ड्यांमुळे झाले शेवगावकर बेजार, सगळ्यांना झालेत मणक्याचे अन् कमरेचे आजार, आम्हाला फिरण्यासाठी चांगला रस्ता द्या, असे फलक होते. दोन वर्षांपासून शहर व तालुका सरहद्दीतील नगर, पैठण, गेवराई, नेवासा, पांढरीपूल राज्यमार्गाची भयावह दुरावस्था झाली आहे. रस्त्यांची ही आवस्था प्रत्येकाला सतावत आहे. यामुळे अनेक वाहनांची मोडतोड झाली, प्रवाशांना मणक्यांचा आजार बळावला, अपघातात काहींना आपला जीव गमवावा लागला, तरी वेगवेगळी कारणे सांगून या मार्गांना झळाळी मिळाली नाही.

फक्त कोटींचा निधी आल्याचा गवगवा केला गेला. पैठण राज्यमार्गाचे नऊ किलो मीटरचे काम केवळ उद्घाटनामुळे लांबले आहे. ही शोकांतिका आहे. अनेक संघटना, पक्ष यांनी वेळोवेळी आंदोलने उभारली, खुद्द भाजप कार्यकर्त्यांत याचा संताप असताना लोकप्रतिनिधी बेदखल दिसत असल्याने या रस्त्याने प्रवास करणार प्रत्येक प्रवाशी लाखोली वाहत आहे.

या आंदोलनात गौतमी नांगरे, युवराज दुसंग, शैलेश तिजोरे, आरव तिजोरे, सुयेश मगर, साई केमसे, श्रद्धा केमसे, राजनंदिनी फुंदे, यश फुंदे, अमन विश्वकर्मा, पूजा विश्वकर्मा, काजल विश्वकर्मा, सुरज नांगरे, गौरव नांगरे, साईराज नांगरे, राज वरे, सायली वरे, कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे, राम लांडे, बाबूलाल सय्यद, क्रांती मगर, शेखर तिजोरे, राजेंद्र दुसंग, प्रेम अंधारे, शरद म्हस्के, प्रीतम नाईक, सुनील आहुजा आदींनी सहभाग नोंदविला. कॉ.संजय नांगरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रेय फुंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

नेत्यांनो मतांसाठी याल, तर खबरदार!
सकाळी शेवगाव शहरामधील चिमकुल्यांचाही संताप अनावर झाला. त्यांनी गाडगेबाबा चौक येथील रस्त्यावरील खड्ड्याला कार्यसम्राट खासदार खड्डा, कार्यसम्राट आमदार खड्डा, अशी नावे देवून त्वरित खड्डे मुक्त रस्ते करण्याची मागणी केली. फक्त खड्डे बुजवू नका, तर सर्व राज्यमार्ग मजबूत करा, अशा त्यांनी घोषणा दिल्या. तसेच, निष्क्रीय आमदार व खासदारांनी पुन्हा मतांसाठी याल, तर खबरदार, असा इशारा या चिमुकल्यांनी दिला आहे.

Back to top button