निवडणुकीनंतर हकालपट्टीचे फटाके, शिक्षक बँक मंडळाचे चिंतन | पुढारी

निवडणुकीनंतर हकालपट्टीचे फटाके, शिक्षक बँक मंडळाचे चिंतन

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँकेत झालेल्या पराभवानंतर शिक्षक मंडळांनी चिंतन सुरू केले आहे, काहींचे चिंतन होणार आहे. यात काही ठिकाणी पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून हकालपट्टी सुरू आहे, कुठे ‘कोणी कोणी काम केले नाही’ याचा तालुकानिहाय आढावा घेतला जात आहे, तर एका मंडळात ज्येष्ठांना बाजूला करतानाच उभी फूट पडण्याचे संकेत दिसू लागले आहेत. त्यामुळे बँक आणि विकास मंडळातील पराभव हा सर्वच मंडळांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे चित्र आहे.

सत्ताधारी गुरूमाऊली मंडळाकडून पराभव झालेल्या रोहोकले गुरुजी प्रणित गुरूमाऊली, गुरुकुल, सदिच्छा या मंडळांनी चिंतन सुरू केले आहे. यात सदिच्छा मंडळाने नुकतीच बैठक घेतली. शिक्षक नेते राजेंद्र शिंदे यांनी पाथर्डीतील तालुकाध्यक्षाची पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून हकालपट्टीची घोषणा केली. तसेच लवकरच जिल्हास्तरावर बैठक घेतली जाणार असून, यात मंडळाची 1700 मते गृहीत धरलेली असताना, नेमके कुठं बिघडलं, यावर मंथन होणार आहे. तसेच जिल्हा संघटनेचे पूर्नगठण करण्याचेही शिंदे यांनी सुतोवाच केले आहेत. सदिच्छा आघाडीला पडलेल्या मतांत इब्टाची मते सर्वाधिक होती, सदिच्छाला त्यांच्याच लोकांनी मते दिली नाही, असा सूर इब्टाचे कार्यकर्ते आता आळवू लागली आहेत. तर शिक्षक परिषद, दिव्यांग संघटनेचाही आघाडीला फायदा झाला नाही, असे कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले.

दुसरीकडे रोहोकले गटानेही हा पराभव गंभीरपणे घेतला आहे. या पराभवाची जबाबदारी गुरुजींनी स्वतःवर घेतली. मात्र, ज्या पारनेरमध्ये मागच्या वेळी रोहोकले गुरुजींना मताधिक्य होते. तेवढी गुरुजींची मतेही प्रविण ठुबे यांना मिळू शकलेली नाही. तशीच परिस्थिती इतर ठिकाणीही झाली. त्यामुळे कोणकोणत्या तालुक्यात कोणी कोणी काम केले नाही, याचा तालुकानिहाय आढावा घेण्याची जबाबदारी प्रविण ठुबे यांच्यावर दिल्याचेही कानावर आले. रोहोकले गट देखील पराभवावर मंथन करणार असल्याचे एका जबाबदार पदाधिकार्‍याने सांगितले.

डॉ. संजय कळमकर यांचा पराभव हा धक्कादायक होता. गुरुकुलच्या लोकांनीच कळमकर यांचा करेक्ट कार्यक्रम केला. नेवाशात गुरुकुलच्या दुसर्‍या उमेदवारापेक्षा स्वतः कळमकर यांना 175 मते कमी पडल्याने ही त्यासाठी पुष्ठी समजली जात आहे. वास्तविकतः गुरुकुलकडून ‘त्या’ उमेदवार्‍या नको,म्हणून कार्यकर्ते डॉक्टरांना सांगत होते, मात्र त्यांनी ऐकले नाही. संगमनेरातही कडलग यांची उमेदवारी नाकारल्याने अंतर्गत नाराजांचा गट वाढला होता. त्यामुळे हा पराभव पहावा लागला. आता भविष्यात डॉक्टर बरे पण ‘ते’ दोघे नकोच, या हेतूने मतपेटीतून कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त केल्याचे एकाने स्पष्ट केले. ‘स्वराज्य’मध्येही दुफळी झाली असून, हा वाद आता थेट धर्मादाय आयुक्तांकडे जाण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, ऐक्यकडून बँक आणि विकास मंडळात एक-एक संचालकाने शिरकाव केल्याने त्यांचा विश्वास वाढला आहे. शिक्षक भारतीलाही स्वीकृतची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. यातून संघटन वाढीसाठी ते प्रयत्नशील आहे. सत्ताधारी गटाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी मात्र मोठ्या खुबीने विजयानंतर सर्व शिक्षक सभासद, त्यांचे सहकारी, आणि ज्ञात-अज्ञात हितचिंतकांचेही आवर्जून आभार मानले. तांबे यांनीही संघटन वाढविण्यासाठी सदिच्छा, गुरुकलमध्ये जबाबदार पदाधिकार्‍यांवर जाळे फेकल्याची चर्चा आहे. ’

कळमकरांनंतर कोण, पडद्याआड घडामोडी सुरु!
डॉ. संजय कळमकर यांनी शिक्षकी राजकारणातून आपण बाजूला होत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले. त्यामुळे आता गुरुकुल पुढे कोण चालविणार याविषयी वेगवेगळी नावे चर्चेत आहेत. मात्र, दुसरीकडे पडद्याआड मोठ्या घडामोडी सुरू आहेत. ‘त्या’ ज्येष्ठ नेत्यांनाच बाजूला करण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत झाली आहे. कदाचित, भविष्यात यात गुरुकुल नामशेष होऊन एक नवी संघटनाही उदयास येऊ शकते, असेही विश्वसनीय वृत्त आहे.

गुरुजींच्या राजकीय वारसदाराची चर्चा!
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रोहोकले गुरुजींनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली. त्यांचा अनुभवाचा मंडळाला फायदाही झाला. आता भविष्यात गुरुजींच्या मार्गदर्शनात मंडळाचे नेतृत्व हे तरुण पदाधिकार्‍याने करावे, असा सूर लपून राहिलेला नाही. यात संजय शिंदे, विकास डावखरे आणि प्रविण ठुबे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, गुरुजी ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Back to top button