

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नुकतेच पुण्यात आले होते. यावेळी सोमनाथ गिते यांनी त्यांची भेट घेतली आणि व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा केली. राज्यपालांनी डॉ. सोमनाथ गिते यांच्या लिखाणाचे कौतुक केले व प्रशंसापत्र दिले. तसेच व्यसनमुक्तीचे कार्य आवश्यक असून हे कार्य असेच सुरु ठेवा, असेही म्हणाले. काहीही गरज भासल्यास मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. डॉ. सोमनाथ गिते यांनी मागील काही काळापासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले असून यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी गिते यांना पत्र पाठवत त्यांच्या कार्याची दखल घेतली होती.
त्यानंतर आज झालेल्या भेटीत यावर विस्तृत चर्चा झाली. राज्यपालांनी यावेळी कौतुकाची थाप देत समाजासाठी चांगले काम करत असल्याचे म्हटले. गिते यांच्या याच कामाचे कौतुक करत राज्यपालांनी प्रशंसापत्रात म्हटले आहे की, समाजामध्ये व्यसनाचे भीषण परिणाम दिसत आहेत. व्यसनाचे दुष्परिणाम एकट्या व्यक्तीला नाही तर, संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. तुम्ही केलेल्या लिखाणाचा फायदा समाजाला होत आहे. शाळा, महाविद्यालयांत व्यसनमुक्त विद्यार्थी घडण्यासाठी याचा मोठा हातभार लागेल.
डॉ. सोमनाथ गिते म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माझ्या कामाचे कौतुक करून मला प्रशंसापत्र दिले, हे माझ्यासाठी तसेच माझ्यासारख्या अनेक व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचे आहे. आज कोश्यारी यांच्याबरोबर व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा झाली.