मुळा धरण विसर्गास तब्बल 72 दिवसांनंतर थांबा | पुढारी

मुळा धरण विसर्गास तब्बल 72 दिवसांनंतर थांबा

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  मुळा धरणातून 14 ऑगस्ट रोजी जायकवाडी धरणाच्या दिशेने वाहणारा विसर्ग दिवाळी सणानंतरही सुरूच होता. काल संध्याकाळी तब्बल 72 दिवसांनतर बंद करण्यात आला आहे. पाणी बंद होण्याच्या मार्गावर असताना नदी पात्रावर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांवर फळ्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याचे दिसून आले आहे. मुळा धरणातून जायकवाडी धरणाला पाणी देण्याबाबत उच्चांक झाला. यंदाच्या मान्सून हंगामात पावसाने अपेक्षेपक्षा अधिक बॅटींग करत धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावर धो-धो वर्षाव केला. परिणामी धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये ओलावा पसरला आहे. अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे होत्याचे नव्हते केले. एकीकडे शेती पिकांना अपेक्षित दर लाभत नसताना दुसरीकडे निसर्गाचा प्रकोप पाहता अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला मुळा धरणाचासाठा हा पर्वणी ठरणारा आहे.

मुळा धरण 26 हजार दलघफू पूर्ण क्षमतेने भरले आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे जलस्त्रोत असलेला मुळा भरल्याने शेतकर्‍यांसह पाणी योजना लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधान आहे. दरम्यान, धरणाच्या दरवाज्यातून जायकवाडी धरणाकडे 14 ऑगस्टपासून पाणी वाहत होते. दरवाजे उघडल्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाचा वर्षाव सुरू असताना केवळ 4 दिवसांचा खंड वगळता सलगपणे जायकवाडीकडे पाणी वाहतच आहे. यंदा मुळा धरणाच्या पाण्यामध्ये तब्बल 49 हजार 200 दलघफू इतक्या मोठ्या प्रमाणात नविन पाण्याची आवक झाली. त्यापैकी धरण साठा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उर्वरीत 27 हजार 500 दलघफू इतक्या पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणाला लाभला.

कोल्हापूर पद्धतीच्या डिग्रस, वांजूळपोई, मांजरी, मानोरी या चारही बंधार्‍यांवर फळ्या टाकून पाणी साठवणूक करण्याचे काम सुरू झालेले आहे. फळ्या काढून टाकण्यात आल्याने विसर्गाचा प्रवाह जायकवाडीला वाहत होता. धरणातून विसर्ग घटला आहे. केवळ 500 क्यूसेकने दरवाजातून पाणी वाहत आहे.

सलग 72 दिवस विसर्गाचा उच्चांक
मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील व उपअभियंता शरद कांबळे यांनी पहिल्यांदाच अभिनव उपक्रम राबवित पूर नियंत्रण कक्षाची स्थापना केली होती. कार्यालयातील कर्मचार्‍यांना नेमणुका देत सलग 72 दिवस जायकवाडीच्या दिशेने वाहणार्‍या विसर्गाने मुळातून तब्बल 27 हजार 500 दलघफू इतके पाणी वाहिले. सलग वाहणार्‍या विसर्गाने उच्चांक प्रस्थापित केला आहे.

मुळा धरणाचे बंधारे लाभदायी
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी आमदारकीच्या काळात कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात आणले. या बंधार्‍यांमुळे राहुरी परिसरामधील शेतकरी समृद्ध झाला आहे. मुळा पाटबंधारे विभागाने चारही बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावे, अशी अपेक्षा लागलेली आहे.

Back to top button