शेवगाव तालुका : सुधारित आणेवारीला प्रशासनाची नजर! | पुढारी

शेवगाव तालुका : सुधारित आणेवारीला प्रशासनाची नजर!

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा: खरीप पीक सुधारित आणेवारीला प्रशासनाची नजर लागल्याने, ती पन्नास पैशांच्या पुढे जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टी व सततच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे खुद्द महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पाहणी दौर्‍यात कबूल केले आहे. त्यामुळे प्रशासनाने जाहीर केलेली आणेवारी चुकीची असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

नजर अंदाज आणेवारीनंतर आता प्रशासनाने 34 गावांच्या खरीप पिकांची सुधारीत आणेवारी जाहीर केली आहे. मात्र, ती पन्नास पैशांच्या पुढे जाहीर झाल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. परतीच्या सततच्या पावसाने व अतिवृष्टीने खरीप पिकांची पूर्ण वाट लागली आहे.

सलग तीन वर्षे निसर्गाच्या कोपाने तालुक्यात पिकांच्या नासाडी झाली असून, टंचाईला सामोरे जाताना शेतकर्‍यांची सहनशीलता संपत आली आहे. परंतु, अपेक्षेवर दरवर्षीच कष्टाने पीक घेणारा शेतकरी संकटाच्या घामात भिजत आहे. तरीही प्रशासनाला त्याची किव येत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. एरव्ही आम्ही शेतकरी आहोत, असे म्हणणारे प्रशासनातील अधिकारी आणेवारी जाहीर करताना मात्र ते विसरून जातात.

यंदा कपाशी, बाजरी, तूर, सोयाबीन, कांदा आदी पिके परतीच्या पावसाने वाया गेली. याबाबत शेतकर्‍यांचा आक्रोश लक्षात घेता, राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नुकताच तालुक्यात पीक पाहणी दौरा केला व या तालुक्यात सर्वांत जास्त पिकांचे नुकसान झाल्याची कबुली दिली. शेतकर्‍यांना कुठली अडचण येऊ नये, यासाठी ई-पीक पाहणीची अट यंदापुरती शिथिल केली आहे.

असे असताना महसूलमंत्र्यांच्या दौर्‍याला न जुमानता प्रशासनाने लावलेली सुधारित आणेवारी बळीराजाचा बळी देणारी आहे. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने असा खोडसाळपणा केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, कम्युनिष्ट पक्ष, आम आदमी पार्टी, प्रहार संघटनेच्या शेतकरी कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

खरिपाची सुधारित आणेवारी
आंतरवाली बु, बेलगाव, चेडे चांदगाव, राक्षी, राणेगाव, शिंगोरी, सुकळी (55 पैसे), अधोडी, बोधेगाव, गोळेगाव, लाडजळगाव, नागलवाडी, सोनेसांगवी, शेकटे बु,ठा. निमगाव (56 पैसे), आंतरवाली खु शे, बाडगव्हाण, दिवटे, कोनोशी, शेकटे खु, थाटे, सेवानगर (57 पैसे), कोळगाव (58 पैसे), हसनापूर, माळेगाव ने, सुळे पिंपळगाव (59 पैसे), मंगरूळ बु, मंगरूळ खु, मुरमी, वरखेड (60 पैसे ),सालवडगाव, शोभानगर ( 61 पैसे ), न. बाभुळगाव, वाडगाव (63 पैसे).

Back to top button