नगर : साखर उत्पादनाचा श्रीगणेशा, सव्वालाख मेट्रीक टन गाळप; 16 कारखान्यांना परवाना | पुढारी

नगर : साखर उत्पादनाचा श्रीगणेशा, सव्वालाख मेट्रीक टन गाळप; 16 कारखान्यांना परवाना

नगर; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांना ऊस गाळपाचा परवाना मिळाला असून, प्रत्यक्षात पाच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. या पाच कारखान्यांनी रविवारपर्यंत 1 लाख 17 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून 72 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. 2022-23 या वर्षाच्या गळीत हंगामासाठी 24 साखर कारखान्यांची लगबग सुरु होती.

गाळपासाठी परवाना मिळावा यासाठी कारखान्यांनी नगर प्रादेशिक (साखर) सहसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले.यामध्ये पारनेर तालुक्यातील सोपानराव धसाळ या नवीन खासगी कारखान्याचा समावेश आहे. पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयाने आतापर्यंत जिल्ह्यातील पदमश्री विखे पाटील, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, प्रसाद, शिवाजीराव नागवडे, गणेश, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, कर्मवीर शंकरराव काळे, केदारेश्वर, कुकडी, अंबालिका, ज्ञानेश्वर, वृध्देश्वर, मुळा, अशोक, युटेक व सोपानराव धसाळ या सोळा कारखान्यांना गाळपाचा परवाना दिला आहे.

बहुतांश कारखान्यांनी गव्हाणाची पूजा केली असून आतापर्यंत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, कुकडी, अंबालिका, युटेक अशा पाच कारखान्यांनी साखर उत्पादनास प्रारंभ केला आहे. यामध्ये तीन सहकारी व दोन खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.  पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयाच्या वतीने 30 ऑक्टोबरच्या गाळपाचा अहवाल प्रसिध्द केला.

त्यामधील नोंदीनुसार जिल्ह्यात रविवारपर्यंत 1 लाख 17 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून 72 हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. अंबालिका व युटेक या खासगी साखर कारखान्यांनी ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. या दोन्ही कारखान्यांनी एकूण 95 हजार 505 मेट्रीक टन उसाचे गाळप केले. त्यातून 62 हजार 850 क्विंटल साखर उत्पादित केली. जिल्ह्यात सध्या 6.58 टक्के साखर उतारा आहे.

अंबालिका शुगर्सचे सर्वाधिक गाळप
अंबालिका शुगर्स कारखान्याने सर्वाधिक 86 हजार 85 मेट्रीक टन उसाचे गाळप करुन 60 हजार 600 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याने 16 हजार 310 मेट्रीक टन उसाचे गाळप केले. त्यातून 9 हजार क्विंटल साखर उत्पादित केली. युटेक शुगरने 9 हजार 420 मे.टन उसाचे गाळप केले असून, 2 हजार 250 क्विंटल साखर निर्माण केली. कुकडी साखर कारखान्याने 5 हजार 300 मे. टन गाळप केले.

Back to top button