नगर : दहा दिवसांत 370 जनावरांचा मृत्यू; जिल्ह्यात लम्पीचा हाहाकार सुरूच

file photo
file photo

नगर; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात लम्पीचा कहर अजूनही सुरूच आहे. गेल्या दहा दिवसांत तब्बल 370 जनावरांचा मृत्यू, तर 4944 जनावरे बाधित झाली आहे. तर याच आठ दिवसांत केवळ 295 जनावरांचे लसीकरण झाल्याची संतापजनक माहिती आकडेवारीतून पुढे आली आहे. जिल्हापरिषद आणि राज्याच्या पशुसंवर्धन विभागाला नगरमध्ये लम्पीचा प्रतिबंध करण्यात सपशेल अपयश आले असून, तितकीच जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असल्याचेही बोलले जात आहे.

जिल्ह्यात गेल्या महिनभरापासून लम्पीचे थैमान आणखी वाढले आहे. यात आतापर्यंत 218 गावांत 955 जनावरांचा बळी गेला आहे. दिवाळीला बळीराजा गोमातेचे पूजन करत असतो, मात्र याच दिवाळीच्या आठ दिवसांत तब्बल285 जनावरे दगावल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

21 ऑक्टोबरपर्यंत 670 मृत्यू !
21 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात 11 हजार 700 जनावरे लम्पीने बाधित झाली होती. बाधित जनावरांना उपचार केले जात असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले गेले. दुर्दैवाने या तारखेपर्यंत एकूण मृत्यूचा आकडा हा 670 इतका होता.

31 ऑक्टोबरला मृत्यूचा आकडा 1040 पर्यंत
लम्पीचा हाहाकार कमी होताना दिसत नाही. गेल्या आठवड्यात अर्थात 21 तारखेपर्यंत 670 जनावरांचा मृत्यू झालेला होता. तर पुढील दहा दिवसांत 31 ऑक्टोबरपर्यंत मृत्युचा हा आकडा 1040 इतका झाला. या आठवडाभरात 370 जनावरांचा झालेला मृत्यू प्रशासनाच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

दहा दिवसांत 4800 जनावरे बाधित!
21 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात 11 हजार 700 जनावरे लम्पीने बाधित झाली होती. तर 31 तारखेला बाधितांमध्येही भर पडून 16 हजार 460 इतकी जनावरे लम्पीने ग्रासल्याचे पुढे आले.

बाधितांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण कमीच!
लम्पीने बाधित झाल्यानंतर प्रशासनाकडून उपचार केले जातात. यातून जनावरे बरे होण्याचे प्रमाण हे बाधित जनावरे वाढणार्‍या संख्येपेक्षा कमी आहे. आतापर्यंत 16 हजार 644 जनावरांपैकी 10065 जनावरे बरी झाली आहेत. या दहा दिवसांचा आढावा घेतल्यास यात 4760 जनावरे बाधित झाली, तर 3111 जनावरे बरी झाल्याचे आकडे सांगतात.

दहा दिवसांत केवळ 295 जनावरांचे लसीकरण?
जिल्ह्यात 21 ऑक्टोबरपर्यंत 14 लाख 97 हजार 335 जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर 31 तारखेचा अहवालानुसार लसीकरण झालेल्या जनावरांचा आकड हा 14 लाख 97 हजार 630 इतका होता. त्यामुळे आता या आठ दिवसांत केवळ 295 जनावरांचेच लसीकरण झाले का? असा प्रश्न उपस्थित झाला असून, ही आकडेवारी बोलकी आहे.

कोटींचा खर्च, तरीही लम्पी थांबेना!
लम्पी प्रतिबंधासाठी शासनाने तातडीने एक कोटींचा निधी दिला होता. यातून लस खरेदी, अत्यावश्यक औषध खरेदी, लस टोचणार्‍यांचे मानधन इत्यादीचे नियोजन होते. मात्र, हा निधी केव्हाच संपला, पुन्हा एक कोटीची मागणी करण्यात आली. मात्र, तरीही जिल्ह्यातील लम्पी रोखण्यात जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागाला अपेक्षित यश आलेले नाही.

लस 100 टक्के प्रभावशाली नाही?
जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण झाल्याचे पशुसंवर्धन विभाग सांगत आहे. मात्र, दुसरीकडे बाधित जनावरांची संख्याही वाढतीच आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत असताना, डॉ. संजय कुमकर यांनी ही लस 100 टक्के प्रभावशाली नाही. त्यामुळेच ती लस घेतल्यानंतरही काही जनावरे बाधित होत आहेत. मात्र, बाधित जनावरे गंभीर आजारी पडत नाहीत. तो आजार सौम्य आणि बरा होणारा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मध्यंतरी पाऊस जास्त झाल्याने जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाली. त्यामुळे जी जनावरे अती गंभीर स्वरूपात आजारी होती. त्यांचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आता लसीकरण 100 टक्के पूर्ण झालेले आहे. काही वासरांचे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे लसीकरणाचा आकडा कमी दिसू शकतो.
                                        डॉ. संजय कुमकर, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news