

अकोले, पुढारी वृत्तसेवा : राज्यात परतीच्या पावसामुळे पिके पाण्यात गेल्याने राज्यभर ३६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात सरकारने तातडीने भरपाई व मदत देणे अपेक्षित असताना राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार मात्र केवळ घोषणा व दिखावा करत आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात सलग तीन दिवस ओला दुष्काळ, शेती संकट व ज्वलंत शेतकरी प्रश्नांवर विचार विनिमय करून शेतकरी आंदोलनाच्या वाटचालीची पुढील दिशा निश्चित करणार आसल्याची माहिती किसान सभेचे डॅा.अजित नवले यांनी दिली.
सोमवार ३१ ऑक्टोबर रोजी अकोलेमध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला उत्साहात सुरुवात झाली. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष, डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, किसान सभेचे नेते आ.जे.पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले यांच्यासह ६५ राज्य कौन्सिल सदस्य व महाराष्ट्रभरातून २३ जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडण्यात आलेले ३०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांची भव्य रॅली संपन्न झाली. बाजारतळ येथून निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामीण श्रमिक व कामगार सहभागी झाले होते. शेतकरी रॅलीनंतर महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषद व जाहीर सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रसाद, जे.पी.गावीत, आ. विनोद निकोले, किसन गुजर, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख व अर्जुन आडे यांनी संबोधित केले.
यावेळी मोदी सरकारही सातत्याने शेतकरीविरोधी व कॉर्पोरेटधार्जिणे धोरण राबवीत आहे. देशभर यामुळे शेती संकट अधिक तीव्र होत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, असे नवले यांनी सांगितले. एक वर्षभराच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारला तीन कृषी कायदे रद्द करावे लागले. पण शेतकऱ्यांना कायदेशीर व रास्त आधारभाव, कर्जमाफी, सर्वंकष पीक विमा योजना, वाढीव पेन्शन, सिंचन, वीज, रेशन व अन्नसुरक्षा असे अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत. दुसरीकडे वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, देवस्थान, इनाम, वरकस व इतर जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करणे हे सुद्धा जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर देशाची राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, आर्थिक-सामाजिक न्याय यांचे संरक्षण आणि संवर्धन हे आज कळीचे प्रश्न बनले आहेत. किसान सभेच्या अधिवेशनात या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा करून लढ्याची पुढील दिशा ठरणार असल्याचेही वक्त्यांनी सांगितले.