मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी ताब्यात | पुढारी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी ताब्यात

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व काही महिला पत्रकारांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्यप्रकरणी पोलिसांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल व लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. या प्रकाराने विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे. गणेश नारायण गोटे (वय 29) असे ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र सायबर दलाचे पोलिस अधीक्षक संजय शित्रे यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही महिला पत्रकारांबाबत चुकीच्या पद्धतीने टीका-टिप्पणी केली आहे. याबाबत सायबर पोलिस दलाने शोध घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थी हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे असल्याचे समजले.

या माहितीनुसार पुणे सायबर सेलने ही कारवाई केली. राहुरी पोलिस ठाण्याचे हवालदार सचिन ताजणे व नदीम शेख यांच्यासह सायबर सेल विभागाने ही कारवाई केली. विद्यार्थ्यांकडील दोन मोबाईल व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे शेती शिक्षण क्षेत्रातील संशोधनात संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणार्‍या या विद्यापीठ हद्दीत ही कारवाई झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Back to top button