ओझर खुर्दला 10 एकर ऊस खाक | पुढारी

ओझर खुर्दला 10 एकर ऊस खाक

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : विजेच्या तारांची ठिणगी पडल्याने 5 शेतकर्‍यांचा सुमारे 10 एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्घटना तालुक्यातील ओझर खुर्द परिसरात नेमबाई माळ शिवारात घडली. नेमबाई माळ पायथ्यालगत सावित्रीबाई दत्तू साबळे, विठाबाई लक्ष्मण साबळे, उज्ज्वला शिवराम साबळे, बनाजी बालाजी साबळे व मधुकर सखाराम ठोसर यांची शेती आहे. या शेतीत ऊस आहे. या पाचही शेतकर्‍यांच्या उसाच्या शेताला शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास वीज वाहक तारांची ठिणगी पडल्याने आग लागली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.

उसाच्या फडाला आग लागल्याचे समजताच ओझर खुर्दचे सरपंच पुंजा हरी शिंदे, बकचंद साबळे, लक्ष्मण साबळे, विठ्ठल साळुंखे, कैलास गोराणे, जयराम कांदळकर, कचरू शिंदे, भिका कांदळकर, दौलत बनवाले, साहेबराव उंबरकर, झुंगा साबळे, जगन शिंदे, शिवराम साबळे, मधुकर ठोसर, बनाजी साबळे, जिजाभाऊ शिंदे, विनायक कांदळकर, कारभारी साबळे, धोंडीबा बनवाले, दत्तू शिंदे आदी शेतकर्‍यांनी धाव घेत आग शमविण्याचा प्रयत्न केला. त्यांना यश आल्याने शेजारील शिवारात शेकडो एकर ऊस आगीपासून वाचला.
दरम्यान, आगीची घटना समजल्यावर थोरात साखर कारखान्याचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला, मात्र तोपर्यंत 5 शेतकर्‍यांचा 10 एकर ऊस खाक झाल्याने नुकसान झाले आहे.

Back to top button