अकोलेत किसान सभेचे 23 वे राज्य अधिवेशन ; अतिवृष्टीने ओला दुष्काळप्रश्नी आज करणार आरपार लढ्याचे नियोजन | पुढारी

अकोलेत किसान सभेचे 23 वे राज्य अधिवेशन ; अतिवृष्टीने ओला दुष्काळप्रश्नी आज करणार आरपार लढ्याचे नियोजन

अकोले : पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय किसान सभेचे 23 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आज (दि. 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2022) रोजी (अकोले. जि. अहमदनगर) येथे आयोजित केले आहे. तीन दिवसीय अधिवेशनाची सुरुवात आज जाहीर सभेने होत आहे. दरम्यान, ओला दुष्काळप्रश्नी राज्यव्यापी आरपार लढ्याचे नियोजन अकोले अधिवेशनात करण्यात येणार आहे. राज्य अधिवेशनापूर्वी किसान सभेची राज्यभर रितसर गाव, तालुका व जिल्हा अधिवेशने घेण्यात आली. जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडलेले 300 प्रतिनिधी व किसान सभेचे 71 राज्य कौन्सिल सदस्य तीन दिवसांच्या या अधिवेशनासाठी अकोले येथे उपस्थित राहणार आहेत.

परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचा खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्याने शेतकरी कर्ज बाजारी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी खरीप हंगामासाठी घेतलेले संपूर्ण कर्ज सरकारने माफ करावे, शेतकर्‍यांना उपजिविकेसाठी सहाय्य म्हणून प्रति एकर 50 हजार रुपये भरपाई द्यावी, पीक विमा कंपन्यांनी अग्रिम भरपाई व विमा भरपाई द्यावी, दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, उसाला एफ.आर.पी. अधिक 200 रुपये एक रकमी द्यावे, सर्व पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव कायदा करा, दारिद्र्यरेषा यादीत पात्र लाभार्थींचा समावेश व्हावा, वनजमिनी कसणारांच्या नावे करा, हिरड्याची सरकारी खरेदी सुरू करून रास्त भाव द्यावा, श्रमिकांना घरकुल, रेशन व वृद्धपकाळ पेन्शन द्यावे, रस्ते, कोरीडॉर, धरणे, रेल्वे, हायवे, विमानतळ आदी विकास कामांना जमीन दिलेल्या 2013 च्या कायद्यानुसार भरपाई व पुनर्वसन द्यावे आदी मागण्यांसाठी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सभा होत आहे. यावेळी डॉ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रसाद, माजी आ. जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, आ. विनोद निकोले, अर्जुन आडे, उमेश देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.

Back to top button