सामान्यांची स्थावर मालमत्ता धोक्यात ! नेवासा तालुक्यात सरकारी यंत्रणेला हाताशी धरून मोक्याच्या जागा गिळंकृत | पुढारी

सामान्यांची स्थावर मालमत्ता धोक्यात ! नेवासा तालुक्यात सरकारी यंत्रणेला हाताशी धरून मोक्याच्या जागा गिळंकृत

नेवासा : पुढारी वृत्तसेवा  : तालुक्यातील मोक्याच्या जागा बळकावणार्‍यांना सर्वच शासकीय यंत्रणांचे सहकार्य मिळत असल्याने, सामान्य जनतेच्या स्थावर मालमत्ता धोक्यात आल्या आहेत.या प्रकाराने जनतेचे धाबे दणाणले आहेत. नेवासा, नेवासा फाटा, तसेच परिसरातील कोणतीही स्थावर मालमत्ता सध्या सुरक्षित नाही. कागदपत्रांमध्ये फेरफार करून व बनावट नकाशे तयार करून जमिनी बळकावण्याचा धंदा सध्या मोठ्या प्रमाणात अधिकार्‍यांच्या सहकार्याने तालुक्यात सुरू आहे.

मुळा धरणाची निर्मिती झाल्यापासून प्रवरा खोर्‍यातील नेवासा तालुका हा जिरायत असलेला भाग बागायत झाला. त्यामुळे या भागातील जमिनींना मोठे मोल आले. तसेच नगर-औरंगाबाद महामार्ग, औरंगाबाद आणि नगर औद्योगिकीकरणानंतर महामार्गावर नेवासा फाटा या ठिकाणाला मोठे महत्त्व आले. या ठिकाणी व्यवसायाबरोबर बकालपणा वाढताना मोक्याच्या जागा बळकावणे, तसेच अतिक्रमणे वाढली. गेल्या काही वर्षांत या वाहत्या गंगेत हात धुताना शासकीय अधिकारी सर्वात पुढे झाले. त्यामुळे या अतिक्रमणांना खोटी कागदपत्रे तयार करून व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे.

नुकत्याच घडलेल्या अशा काही घटनांचा माहिती घेतली असता, असे निदर्शनास येते की तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी आणि जमीन व्यवसायातील दलाल यांचे अशा बनावट कामांमध्ये साटेलोटे आहे. उतारा एका बाजूला, मोजणी केलेली जमीन दुसर्‍या बाजूची, एका मालकाची जमीन मोजून देत असताना दुसर्‍या लगतच्या मालकाची कुरापत काढणे, जमीन मालकांमध्ये भांडणे लावून देणे, एखाद्याची जमीन कमी मोजून देणे, मोजणीनंतर उभय पक्षांमध्ये वाद निर्माण राहतील, अशी व्यवस्था करणे, तालुका भूमि अभिलेख कार्यालयातील सरकारी कर्मचार्‍याने कामांसाठी अवैधरित्या खासगी व्यक्तींना नेमणे, मोजणी करताना कुठल्याही नियमांची अंमलबजावणी न करता कागदावरच नकाशा तयार करून मोजणी झाल्याचे दाखविणे, असे अनेक गैरप्रकार भूमी अभिलेख कार्यालयात उघडकीस आले आहेत.

कार्यालयातील वादग्रस्त कर्मचारी संग्राम लवांडे हा गेल्या सात वर्षांपासून या कार्यालयात कार्यरत आहे. त्याने अनेक प्रकरणांमध्ये मूळ मालकांच्या दस्तात अवैधरित्या फेरफार केले आहेत. एका मालकाची जमीन त्या भागात अस्तित्वात नसलेल्या उतार्‍यावर दाखविण्याचा प्रताप नुकताच संग्राम लवांडे याने केला. हे करत असताना साक्षीदार पंचांच्या खोट्या सह्या घेणे, कागदावर चुकीचे दिशा निर्देशन करणे, दुसर्‍याच्या नावे असलेली मोजणी स्वतःच्या नावावर करून घेणे, लगतच्या कब्जेदाराला नोटिसा न पाठविता परस्पर मोजणी करून देणे, मोजणीसाठी सरकारी दप्तरातील नकाशा न वापरता दलालांनी पुरविलेला नकाशा फेरफार करून वापरणे व बनावट प्रकरण बनविण्यासाठी अशा दलालांना मदत करणे, अशी कार्यपध्दती आढळून आली आहे.

या कर्मचार्‍यांविरुद्ध कार्यालय प्रमुख उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे डॉ. करणसिंह घुले यांनी रितसर तक्रार केली असून, त्यावर कार्यालयाकडून फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली आहे. फाट्यावरील डॉ. घुले यांच्या मालकीच्या जमिनीची लवांडेने परस्पर काही दलालांना मोजणी करून दिल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. या मोजणीसाठी वापरलेली सर्व दस्त, कागदपत्रे ही बनावट असून मोजणी करताना कुठल्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही. म्हणून कार्यालयाकडून संग्राम लवांडे यांच्या सात वर्षांच्या कामाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमावी. त्याला कार्यालयात काम करण्यास विशेषतः मोजणीचे व दस्त हाताळण्याचे काम करण्यास त्वरित प्रतिबंध करावा. कार्यालयाने संग्राम लवांडे यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. करणसिह घुले यांनी वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा
नेवासा फाट्यावर असलेले भूमि अभिलेख कार्यालय हे दलालांचा अड्डा बनले असून, दलालांमार्फत कार्यालयातील कारभार चालतो. त्यामुळेच नेवासा तालुक्यात जमिनी बळकावणार्‍या अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. या कार्यालयातील गुंडाराज संपवून येथील दोषी कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, असे समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी सांगितले.

 

Back to top button