विधवा पुनर्विवाहास 16 हजारांची मदत..! आंबी खालसा ग्रामपंचायतीचा निर्णय | पुढारी

विधवा पुनर्विवाहास 16 हजारांची मदत..! आंबी खालसा ग्रामपंचायतीचा निर्णय

बोटा; पुढारी वृत्तसेवा: विधवा महिलांचे अनेक प्रश्न बिकट आहेत. अनेक योजना राबवूनही त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील ग्रामपंचायतीने गावातील विधवांसाठी पुढाकार घेतला आहे. उपेक्षेचे जिणे वाट्याला आलेल्या विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्याचा ठराव ग्रामसभेने केला असून, त्यांच्या पुनर्विवाहासाठी 11 हजार रुपये व सरपंच बाळासाहेब ढोले यांचेकडून वैयक्तिक 5 हजार रुपये असे एकूण 16 हजार रुपयांची मदत देण्याचा मानवतावादी निर्णय ग्रामसभेने घेतला आहे. असा निर्णय घेणारी जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत असून, या आदर्श निर्णयाचे स्वागत होत आहे.

पतिनिधनानंतर महिलेचे सामाजिक जीवन उद्धवस्त होत असते. राजा राममोहन राय, ईश्वरचंद विद्यासागर, शाहू महाराज, महात्मा फुले यांनी विधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. तोच वसा आंबी खालसा ग्रामपंचायतीने घेतला आहे. गावातील ज्या विधवा तरुणी पुनर्विवाह करतील, त्यांना 16 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा पुरोगामी निर्णय ग्रामसभेने घेतला आहे. आंबी खालसा ग्रामपंचायत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते.

नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीने पुरोगामी विचारांचा निर्णय घेऊन इतर ग्रामपंचायतींना आदर्श घालून दिला आहे. वाढते अपघात व कर्करोग, हृदयरोग अशा आजारांनी तरुणांना येणारे अकाली मृत्यू यामुळे तरुण वयात विधवा होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, संपूर्ण आयुष्य एकटेपणाने जगण्याची वेळ महिलांवर येते. समाजातही तिची बहुधा उपेक्षाच होताना दिसते. अशा विधवा महिलांना पुन्हा सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या पुनर्विवाहासाठी सरपंच ढोले यांचेकडून 5 हजार व ग्रामपंचायतीकडून 11 हजार असे 16 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे.

अशा प्रकारच्या ठरावाची मागणी सरपंच बाळासाहेब ढोले यांनी स्वतः केली होती. त्याला एकमुखी पाठिंबा देत तसा ठराव ग्रामसभेने केला. यासाठी महिला व बालकल्याणसाठी तरतूद असलेल्या 10 टक्के ग्रामनिधीतून मदत दिली जाणार आहे. ग्रामसभेस ग्रा. अधिकारी एस.एल. दारूणकर, उपसरपंच रशीद शेख,सुरेश गाडेकर,सदस्य दिलीप हांडे,शुभांगी कहाणे, मनीषा गाडेकर, दिपक गावडे, अनिता तांगडकर,अंजली गाडेकर, विलास मधे, सुवर्णा गडगे,अंजना जाधव, व्ही.के. माने, शुभम गाडेकर, अनिल कहाणे, श्यामराव ढमढेरे, सुरेश गाडेकर, बाळासाहेब गाडेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

36 बचत गटांची केली स्थापना
दोन वर्षांपूर्वी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडून सरपंचपदी विराजमान झालेले बाळासाहेब ढोले यांनी महिला उन्नतीसाठी व महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी गावातील सर्व महिलांना एकत्र करीत महिला महासंघामार्फत 36 बचत गटांची स्थापना केली. महिलांना पुरक उद्योगांची उभारणी करुन देऊन महिला सक्षमीकरणाचे महत्वपूर्ण काम केले. महिला बालकल्याण मधून ज्या घरी मुलीचा जन्म होईल, त्यांना मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी 1 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे ग्रामसभेत सर्वानुमते ठरले.

मृत्यू झालेल्या तरुणाच्या पश्चात विधवा सहचारिणीचे उर्वरित जीवन हलाखीचे होते. या समस्येला छेद देण्यासाठी उपाययोजनात्मक छोटासा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला आहे. विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय आंबी खालसा ग्रामपंचायतीने घेतला. असा निर्णय घेणारी ही पहिलीच ग्रामपंचायत असावी.

                                              – बाळासाहेब ढोले, सरपंच, आंबी खालसा.

Back to top button