नेवासा : विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांची थट्टा : आमदार शंकरराव गडाख | पुढारी

नेवासा : विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांची थट्टा : आमदार शंकरराव गडाख

नेवासा; पुढारी वृत्तसेवा: शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करणार असल्याचे सांगतानाच विमा कंपन्या नाममात्र भरपाई देऊन शेतकर्‍यांची थट्टा करीत असल्याची खरमरीत टीका आमदार शंकरराव गडाख यांनी केली. तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ शनिवारी आमदार गडाख व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार गडाख बोलत होते.

आमदार गडाख म्हणाले की, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कपाशी, सोयाबीन, कांदा, तूर, ऊस, मका यासह सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त सर्वच पिकांचे महसूल व कृषी यंत्रणेने सरसकट पंचनामे करतानाच पंचनामे करताना हयगय करू नये. पिकांचे नुकसान होऊन देखील पीक विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांना अवघे पाचशे ते हजार रुपये देऊन शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार पीक विमा कंपनीकडून सुरू आहे.

शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी त्यांची क्रूर चेष्टा विमा कंपन्यांकडून सुरू आहे.पंचनामे झालेल्या व होणार्‍या सर्वच पिकांचे शेतकर्‍यांना तातडीने भरीव अनुदान शासनाने द्यावे, तसेच विमा कंपन्यांनीही नुकसान झालेल्या पिकांना सरसकट भरीव विमा तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यांत जमा करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा व लवकरात लवकर मदत द्यावी, अन्यथा पुढील काळात माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी आग्रही भूमिका घेऊन आंदोलन करू असे आमदार गडाख यांनी सांगितले.

माजी आमदार मुरकुटे म्हणाले, आमदार गडाख व मी शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. शासनाने शेतकर्‍यांना भरीव मदत करावी शेतकर्‍यांची थट्टा करू नये, असे ते म्हणाले. तसेच, बेलपिंपळगाव येथे बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजन योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केले.

याप्रसंगी प्रा. कार्लस साठे यांनी आमदार गडाख यांनी बेलपिंपळगाव व परिसरातील विविध रस्ताकामे मार्गी लावून शेतकर्‍यांची व नागरिकांची गैरसोय दूर केली, याबद्दल आमदार गडाख यांचे कौतुक केले. प्रास्ताविक गणेश छल्लारे यांनी केले. याप्रसंगी पुंजाराम पटारे, सकाहरी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी वसंतराव रोटे, सरपंच चंद्रशेखर गटकळ, कृष्णा शिंदे, अमोल कोकणे, बाळासाहेब तर्‍हाळ, बाबासाहेब भांड, बाळासाहेब शेरकर, बाळासाहेब शिंदे, वसंत शेरकर, किशोर गारुळे, भीमजी साठे, सुभाष सरोदे, बंडू चौगुले, कुंडलिक सरोदे, किरण साठे, आदींसह ग्रामस्थ,बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरकुटेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार
शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी नेहमी आग्रही व प्रयत्नशील आहे. यापुढील काळात नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने मदत केली नाही, तर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करू, असे म्हणताच शेतकर्‍यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

Back to top button