कोळगाव : ऐन दिवाळीत कोळगावमध्ये निर्जळी; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती | पुढारी

कोळगाव : ऐन दिवाळीत कोळगावमध्ये निर्जळी; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

कोळगाव; पुढारी वृत्तसेवा: कोळगावमध्ये सणासुदीच्या काळात पाणी न आल्याने ग्रामस्थांना दिवाळी, पाडव्याला पाण्यासाठी धावपळ करावी लागली. यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. सणासुदीच्या काळात प्रत्येक वेळी असे चित्र दिसून येते. यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची निष्क्रियता असल्याचा आरोप माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी केला.

कोळगाव तालुक्यातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे गाव असून, गावाला मोहरवाडी तलावातून 1991 मध्ये झालेल्या पाईपलाईन योजनेमधून पाणीपुरवठा होतो. ही जलवाहिनी अनेक वेळा फुटते; परंतु वेळेत त्याची दुरुस्ती न झाल्याने व ग्रामपंचायत पदाधिकारी त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने गावाला सातत्याने व वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. आताही ऐन दिवाळीत पाच ते सहा दिवसांत गावाला पिण्यासाठी पाणी न आल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. त्यामध्ये वेळ वाया गेला. दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले. दिवाळीनिमित्त बाहेरगाहून आलेले ग्रामस्थ, पाहुण्यांनाही निर्जळीचा सामना करावा लागला.

ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक सातत्याने गैरहजर असतात. त्यांचे सर्वसामान्यच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते. आल्यानंतर फक्त काही कामे पूर्ण केले जातात; परंतु सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रश्नाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जाते. आजपर्यंत अनेक वेळा ग्रामसभेत झालेल्या विषयांनाही हात न लावता ते विषय तसेच रेंगाळत ठेवले जातात. ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते.

ग्रामपंचायतीची रस्त्याची कामे चालू आहेत, त्यामध्ये सिमेंटचा दिलेल्या प्रमाणानुसार वापर होत नाही. गावातील रस्ते ठिकठिकाणी खोदलेले आहेत. अनेकांकडून सांडपाणी रस्त्यावर सोडले जाते. ग्रामपंचायतीतर्फे मोकळ्या जागांची साफसफाई केली जात नाही. नवीन पाईपलाईन योजना लवकर कार्यान्वित करावी, अशी मागणी पुरुषोत्तम लगड, संतोष मेहत्रे यांनी केली आहे.

कोळगावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जुनी झाली आहे. एका ओढ्यामध्ये फुटली होती. त्यात कारखान्याच्या रस्त्याच्या कामामुळे पाण्याचा प्रचंड फ्लो नेमका त्याच ठिकाणी साठला. त्यामुळे लिकेज काढता आले नाही. एक व्हॉल्व्ह चोरीला गेला. नवीन जलवाहिनीद्वारे पाणी आणून नवीन टाकीत पाणी सोडले. 30 एचपीची मोटार तेथे बसविली आहे. आता पाण्याची समस्या राहिलेली नाही. सुरळीतपणे पाणीपुरवठ्याचा प्रयत्न करत आहे.
                                                               – भीमराव बेरड, ग्रामसेवक

Back to top button