सरपंच, ग्रामसेवक आमचं ऐकत नाहीत ! जेऊर ग्रामपंचायत सदस्याच्या आरोपाने खळबळ | पुढारी

सरपंच, ग्रामसेवक आमचं ऐकत नाहीत ! जेऊर ग्रामपंचायत सदस्याच्या आरोपाने खळबळ

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकारी आमचं ऐकतच नसल्याचा आरोप विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील सर्वात मोठ्या जेऊर ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेला अजब कारभार पाहावयास मिळत आहे. जेऊर ग्रामपंचायतीच्या सदस्यांमध्येच एकमत नसल्याचे वारंवार दिसून आलेले आहे.

त्यातच सत्ताधारी गटाचेच ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी आमचं ऐकत नसून, मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप केल्याने जेऊर ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराला ग्रामस्थ वैतागलेले आहेत. कोणतेही विकास कामे होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी दिसून येत आहे. रस्ते, वीज, पाणी, कचरा, आरोग्य, गटार, अतिक्रमण, ग्रामस्वच्छता, ग्रामसुरक्षा यंत्रणा बंद, आठवडे बाजारला जागा नाही, अशा अनेक समस्या गावासमोर आहेत. त्यातच अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

परंतु, या समस्यांवर चकार शब्द बोलायला कोणी तयार नाही. सीना नदीवरील संतुकनाथ विद्यालयाचा पूल, तसेच खारोळी नदीवरील कोथिंबीरे मळा पूल व म्हस्के वस्ती येथील पुलाला भगदाड पडलेले आहे. संतुकनाथ विद्यालयाच्या पुलाला खर्च मोठा येणार आहे. परंतु, कोथिंबिरे मळा व म्हस्के वस्ती येथील पुलाची आताच दुरुस्ती केली तरच पूल वाचू शकतो. सदर पुलाची परिस्थिती सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष दाखविण्यात आली. काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु, त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. ग्रामपंचायत सदस्यांचेच काम सरपंच, ग्रामविकास अधिकारी ऐकत नसतील, उडवाउडवीची उत्तरे देत असतील, तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असणार? असा प्रश्न बेल्हेकर यांनी उपस्थित केला आहे.

गावामध्ये अनेक प्रश्न ऐरणीवर आले असून, विविध कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. रस्त्यांअभावी शेतकर्‍यांचे हाल होत आहेत. कचर्‍यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत. पिण्याची पाण्याची समस्या आहे, विजेचा लपंडाव सुरू आहे. पथदिवे, चौक सुशोभीकरण, अतिक्रमण या विकासाच्या मुद्द्यावर बोलायला कोणी तयार नाही, अशी खंतही बेल्हेकर यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत सदस्य म्हणून नागरिक आम्हाला प्रश्न विचारतात. समस्या सांगतात. पण, वास्तविक सरपंच व ग्रामविकास अधिकारीच आमचं ऐकत नसतील, तर आम्ही तरी काय करावे. आम्ही आता हतबल झालो असल्याचे बेल्हेकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

म्हस्के वस्ती व कोथिंबीरे मळा येथील खारोळी नदीवरील पूल दुरुस्तीची मागणी बेल्हेकर वस्ती, ठोंबरे मळा, माळखास, डोंगरगण कडे जाणारे नागरिक, चापेवाडी, शेटे वस्ती, म्हस्के वस्ती येथील नागरिक करत आहेत. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य बेल्हेकर यांनीच सरपंच व ग्रामविकास अधिकार्‍यांवर आरोप केल्याने ग्रामस्थही अवाक् झाले आहेत.

ग्रामपंचायतीला वालीच नाही
ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थच काय पण सदस्यसुद्धा फिरकत नाहीत. विकास कामे होत नसल्याने सदस्यांमध्ये उदासीनता आल्याचे दिसून येते. यापूर्वी विरोधक रोजच ग्रामपंचायतीमध्ये विविध विषयावरून वाद घालताना दिसून येत होते. परंतु, आता विरोधकही फिरकत नाहीत. यामागील गौडबंगाल काय? ग्रामपंचायतीला कोणी वालीच नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गावाच्या विकासाला फटका
ग्रामपंचायतीमध्ये सत्ता स्थापन झाल्यापासूनच कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. कोणाचाच कोणाला ताळमेळ राहिलेला नाही. ग्रामविकासाची, गावातील कामांची कोणालाही चिंता नाही. गावात अनेक समस्या असून, त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या सावळ्या गोंधळामुळे गावाच्या विकासाला मोठा फटका बसत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

Back to top button