लंपीग्रस्त जनावरांवर प्लाझ्मा थेरपी यशस्वी | पुढारी

लंपीग्रस्त जनावरांवर प्लाझ्मा थेरपी यशस्वी

बोटा : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील पशुसंवर्धन दवाखान्या अंतर्गत येणार्‍या गावांतील लम्पी स्कीन आजार नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत हायपरइम्यून प्लाझ्मा थेरपीचा वापर करून लंपीग्रस्त गंभीर जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. जनावरे बरी होत असल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पठारभागातील गावात 225 लंपी स्कीन आजाराने बाधित झालेली जनावरे आढळून आले.

येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाकचौरे यांच्यासह सर्व टीमने वेळीच लसीकरण मोहीम हाती घेतल्याने वेगाचा प्रादुर्भाव नियंत्रित क्षेत्राबाहेर अधिक वाढला नाही. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत या जनावरांवर उपचार केले. त्यात 75 टक्के जनावरे बरे करण्यात यश मिळविले आहे. 60 जनावरांवर उपचार सुरु आहेत.

यातील 9 जनावरे गंभीररित्या आजारी होते. त्यांच्यावर हायपरइम्यून प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. यामुळे 8 जनावरे बरे झाले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्याने अनेक जनावरांचा जीव वाचविण्यात यश मिळणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी वाकचौरे यांचे म्हणणे आहे. पशुधन वाचविण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाकचौरे यांनी युरोप खंडातील आयर्लंड देशात प्लेटलेट व मेगाकेरी ओसाइट्स बायोलॉजी या विभागात पी. एच. डी. करणारे पुण्यातील डॉ. विशाल साळुंके यांच्याशी संपर्क केला. ते स्वतः घारगाव येथे आले. त्यांनी हायपरइम्यून प्लाझ्मा थेरपी वापराबाबत मार्गदर्शन केले.

Back to top button