

नगर : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या संकल्पनेतून मोठ्या प्रतिक्षेनंतर नगर येथे 'कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे कार्यालय सुरू झाले. मात्र, संबंधित कार्यालय हे शहरापासून 10 किलोमीटर दूर आहे. तसेच, एमआयडीसी आणि नागापूर यांच्याही मधोमध आणि तेही गल्लीबोळात आहे. त्यामुळे संबंधित कार्यालय शोधण्यासाठी दररोज शेकडो लाभार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे हे कार्यालय म्हणजे 'असून अडचण आणि नसून खोळंबा, असे झाले आहे. प्रशासनाने विमाधारकांच्या सुविधेसाठी संबंधित कार्यालय हे नगर शहरात स्थलांतरित करावे, अशी मागणी केली जात आहे.
राज्य कर्मचारी अधिनियमांतर्गत विमाधारकांना वैद्यकीय लाभ दिला जातो. संबंधितांना वैद्यकीय लाभ देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाने कार्यालये सुरू केली आहेत. परंतु, नगरमध्ये मात्र हे कार्यालय नसल्याने मोठी अडचण तयार झाली होती. जिल्ह्यात 25 हजारांपेक्षा जास्त विमाधारक आहेत. अनेकांनी या संदर्भात तक्रारी केल्यानंतर नाशिक विभागांतर्गत नगर येथे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय झाला. साधारणतः एप्रिल 2022 मध्ये हे कार्यालय चालू झाले.
दळणवळणाच्या दृष्टीने बसस्थानक परिसरात किंवा शहरातील मुख्य भागात हे कार्यालय झाले, तर विमाधारकांना संपर्कासाठी ते सोयीचे ठरणार होते. या संदर्भात अनेकांनी तशी मागणीही केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करून नागापूर आणि एमआयडीसी याच्या मध्यवर्ती भागात आणि अगदी गल्लीबोळात भाडोत्री जागेत हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. महिन्याला अंदाजे 50 हजार रुपये भाडे देऊन हे कार्यालय येथे थाटले आहे. येथे आजमितीला 7 ते 10 कर्मचारी आहेत.
या कार्यालयात दररोज दोनशेपेक्षा अधिक विमाधारकांची वर्दळ असते. तसेच, प्राथमिक उपचारासाठीही विमाधारक येथे येत असतात. मात्र, हे कार्यालयच सापडत नसल्याने अनेकांना जड पावलाने माघारी जावे लागते. काहींना कार्यालय सापडलेच, तर झेरॉक्स काढण्यासाठी पुन्हा तीन किलोमीटर पायपीट करावी लागते. त्यामुळे संबंधित कार्यालय हे शहरात असणे गरजेेचे आहे, असा सूर विमाधारकांचा आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.