नगर : पुढारी वृत्तसेवा : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा विचार जनतेपर्यंत पोहचविणे तसेच महागाई, बेरोजगारी, ओला दुष्काळप्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशाचा डंका पिटविण्यासाठी राष्ट्रवादी शिर्डीत मंथन करण्यासोबतच भविष्याचाही वेध घेणार आहे. 'राष्ट्रवादी मंथनः वेध भविष्याचा' नावाने 4 ते 5 नोव्हेंबरला दोन दिवसीय शिबिर शिर्डीत होणार असल्याची माहिती नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
आगामी निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्त्यांची मनोभूमिका अधिक बळकट होण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधकांना दहशतीखाली ठेवण्यात येत आहे. याच यंत्रणांचा वापर करून सत्तांतर घडवले असल्याचा आरोप फाळके यांनी केला.
या पार्श्वभूमीवर राज्यात नेमके वास्तव काय आहे, याविषयी मंथन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेत्यांसह राज्यातील आजी माजी आमदार, 'युवक, विद्यार्थी, युवती'चे प्रदेशाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, आजी माजी प्रमुख पदाधिकारी असे 2500 जण यात सहभागी होणार असल्याचे फाळके यांनी सांगितले.
जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढविणार !
आगामी निवडणुकांच्या धर्तीवर सर्व लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी, युवक, युवती, विविध सेलच्या माध्यमातून सर्वच्या सर्व 12 विधानसभा मतदार संघात पक्ष वाढीवर भर देणार आहोत. यातून राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या जागा वाढतील, निश्चितच याचा महाविकास आघाडीलाही फायदा होणार आहे. असेही जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आवर्जून सांगितले.
विखेंच्या बालेकिल्ल्यात पवारांचा मुक्काम !
पवार-विखे संघर्ष राज्याला नवा नाही. महसूलमंत्री विखेंच्या मतदार संघातील शिर्डीतच राष्ट्रवादीने राज्यस्तरीय शिबिर आयोजित केले आहे. पक्षाचे नेते शरद पवार हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवस शिर्डीतच तळ ठोकणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या 48 तासांत पवार हे विखेंच्या बालेकिल्ल्यासह अन्य कुठे-कुठे राजकीय सुरंग पेरणार? याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.