आंबी दुमाला वन परिक्षेत्रात पक्ष्यांची शिकार | पुढारी

आंबी दुमाला वन परिक्षेत्रात पक्ष्यांची शिकार

बोटा : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आंबी दुमाला गावाच्या वनक्षेत्रातील चंभारदरा परिसरात पक्षाची शिकार करून त्यास भाजून खाल्ले गेले असल्याचे निदर्शनास आले. या स्थळावर मोराची पिसे व इतर अवशेष आढळल्याने तिथे मोराची तसेच अन्य पक्षी, प्राण्यांची शिकार व तस्करी होत असल्याचा प्रकार शेतकर्‍यांच्या निदर्शनास आला आहे. तालुक्यातील पठार भागात तसेच आंबी दुमाला गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून यात विविध पशु- पक्षी वास्तव्यास आहेत, परंतु हल्ली वनपरिक्षेत्रात राष्ट्रीय पक्षी मोर तसेच अन्य पक्षी, प्राणी यांची संख्या घटत चालली आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असल्याचे निर्दशनास येत आहे.

यात मोठ्या प्रमाणावर होणार्‍या वन्य जीवांची शिकार तसेच तस्करी महत्वाचे कारण असल्याचे समोर येत आहे. प्राणी, पक्षांची शिकार करून आजही कोंबड्यां प्रमाणे मोराचे तसेच अन्य पक्षांचे प्राण्यांचे मांस खायला अनेक हौशी लोक पसंती देत असल्याचे निदर्शनास येत आहे. रात्रीच्या अंधारात शिकारीच्या नवनवीन क्लुप्त्या शोधून तसेच छुप्या पद्धतीने पारंपरिक फासे लावून वन्यजीवांची शिकार करणार्‍या अनेक टोळ्या पठार भागात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

यात लवचिक काडी व नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने फास लावून रान डुक्कर, ससे, हरीण, तितर, चकोतरी, लाहुरी, मोर तसेच अन्य पक्षी व प्राण्यांची देखील शिकार करून यांचा वापर तस्करी व मांस खाण्यासाठी केला जात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. तरी देखील पठार भागात वन्यजीवांच्या होणार्‍या शिकारी व तस्करी बाबत अद्याप पर्यंत वनविभागाने कुठलीही कारवाई न केल्याचे आढळून आले आहे. वनविभागाचे अधिकारी वन्यजीवांच्या होणार्‍या शिकारी व तस्करी या बाबींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून डोळेझाक करून आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचे प्रकार समोर येत आहे.

मोर हा भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी असून त्याची शिकार करणार्‍यास वन संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. तर सदर गुन्ह्यात सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. असे असताना पठार भागात मोरांची संख्या तर दिवसेंदिवस घटत चालली आहे.त्याच बरोबर इतर पक्षी, प्राण्यांची संख्या देखील यावर वनविभागाने वन्यजीवांची होणारी शिकार व तस्करी रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

सबंधित पक्षाचे मुंडके,हाडे, पिसारे नाशिक विभागात चौकशीसाठी पाठवले आहे.यातून तो पक्षी कुठला कुठला होता हे निष्पन्न होईल .आणि शोध मोहीम चालू आहे.जे कोण असे शिकार करून मांस खात असेल तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
                                            -वनअधिकारी रामदास थेटे, घारगाव

आमच्या गावात वन्यजीव पशू संवर्धन समिती असून गावचे तेराशे एकर वनक्षेत्र आहे. याच क्षेत्रात राष्ट्रीय पक्षी मोराची अथवा इतर पक्षाची हत्या करून भाजून खाल्ले असल्याचा पुरावे सदर ठिकाणी दिसून आल्याने हा घृणास्पद प्रकार निदर्शनास आला आहे. तरी या वनक्षेत्रात मोरांची शिकार व तस्करी होत असल्याचा संशय आहे. तर वनविभाग आधिकार्‍यांनी आपल्या कामात कसूर न करता योग्य तो तपास करत कारवाई करावी.तसेच वन्यजीवांचे संरक्षण करावे हीच मागणी आहे.
                                             -संदीप ढेरंगे, ग्रामस्थ आंबी दुमाला

Back to top button