उगवलेल्याला मावळावंच लागतं ! आमदार राम शिंदे यांचा आमदार रोहित पवार यांना अप्रत्यक्ष टोला | पुढारी

उगवलेल्याला मावळावंच लागतं ! आमदार राम शिंदे यांचा आमदार रोहित पवार यांना अप्रत्यक्ष टोला

नान्नज : पुढारी वृत्तसेवा :  सूर्य उगवला, त्याला मावळावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे उगवलेल्याला देखील मावळावरच लागतं. पण उगवलेल्या काहींना असं वाटतं की मी मावळणारच नाही. असे कधी होत नाही, असा टोमणा आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता मारला. भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष मंजुश्री जोकारे यांनी नान्नज येथील विठ्ठल मंदिरात दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आ.शिंदे बोलत होते.

ते म्हणाले, परवानगी नसताना कारखाना पाच दिवस आधी चालू केला, ही आ. रोहित पवार यांची चूक मी जागेवर पकडली असून, अजित पवार हे शेतकरी विरोधी आहेत का? त्यांनी का नाही चालू केला त्यांचा कारखाना? असे ते म्हणाले. कर्जतमधील एका दुकानदाराकडे परवानगी असताना, केवळ वीस मिनिटे दुकान उशिरा बंद केल्याने त्याला दंड ठोठावण्यात आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. दिवाळी फराळांच्या गोड कार्यक्रमात आ.शिंदे यांनी आ.पवार यांना चांगलेच सुनावल्याचे दिसून आले.

यावेळी माजी सभापती भगवान मुरूमकर, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, ज्योती क्रांती मल्टिस्टेटचे अध्यक्ष आजिनाथ हजारे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, मनीषा मोहळकर, सुरेखा कोळपकर, बापूराव ढवळे,सुनील हजारे, संतोष मोहळकर, सचिन मलंगनेर, भाऊसाहेब कोळपकर, मारुती गाडेकर, किशोर जोकारे, राम परदेशी, अनिल हजारे, अजय पंडित, मजहर पठाण, डॉ.अर्जुन मोहळकर यांच्यासह नान्नज परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन निकम महाराज, आभार मंजुश्री जोकरे यांनी मानले.

Back to top button