गुन्हेगारी घटनांमुळे श्रीरामपूूर शहर हादरले, पतीकडून पत्नीचा खून; महिलांचे दागिने ओरबाडले

file photo
file photo

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा: शहरातील नेवासा रोडवर झालेल्या विविध गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील नागरिक हादरले आहेत. शहरातील कांदा मार्केटसमोर भीमनगर येथे खुनाची घटना घडली. पतीने आपल्या गर्भवती पत्नीला बेदम मारहाण केली. या घटनेत तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोनाली गणेश गायकवाड (वय 18) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. मयत सोनाली हिने आपल्या पतीकडे माहेरी जाण्यासाठी हट्ट धरला होता. परंतु, पती गणेश गायकवाड याने नकार दिला. यावरून या दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपी गणेश याने सोनाली हिस जबर मारहाण केली. या मारहाणीत सोनाली ही जखमी झाल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी वंदना भीमराव लोंढे यांनी शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपी गणेश गायकवाड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गणेशला पोलिसांनी अटक केली आहे. दुसर्‍या घटनेत नेवासा रोडवर वडाळा महादेव शिवारात मुठेवाडगाव येथे घरी चाललेला तरुण सलमान शेख याला तिघांनी अडवून चाकूने भोसकण्याची धमकी देऊन त्याची दुचाकी, पाकीट आदी वस्तू लुटून नेल्या. रात्री 11. 30 वा. हा प्रकार घडला. शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तिसर्‍या घटनेत कांदा मार्केट नेवासा रोडने जाणारी महिला पल्लवी रविंद्र चव्हाण यांच्या हातातील पर्स दुचाकीवर आलेल्या दोघांनी हिसकावून नेली. यात सुमारे 40 हजार रोख व 50 हजारांचे गंठण होते. दोघा अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. डीवायएसपी संदीप मिटके, पो. नि. हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली . चौथ्या घटनेत नेवासा रोडवर कांदा मार्केट येथे भगवती अ‍ॅग्रो दुकान फोडून चोरट्यांनी अडीच लाखांचे ठिबक साहित्य चोरून नेले. राहुल पवार यांनी तशी शहर पोलिसात तक्रार दिली. विशेष म्हणजे नेवासा रोडवरच हे गुन्हे घडले.

श्रीरामपूर शहरात वॉर्ड नं 3 साधना निवास यांचे घरासमोरून स्प्लेंडर दुचाकी चोरट्याने चोरून नेली. तशी तक्रार वैभव भागचंद चुडीवाल या तरुणाने पोलिसात दिली. दिवाळीचे दिवशी भरदिवसा रस्त्यावर धान्य बाजार कमानी जवळ सवीता दळे (रा. माळवाडगांव) या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकी वरून आलेल्या दोघांनी गळ्यातून ओढून तोडून नेले. तर मेनरोडवर भर दुपारी निकिता फोपसे यांचे 20 हजार रोख व कार्ड चोरट्याने चोरून नेले. पोलिस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत. गेल्या दोनच दिवसात या घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे.

गुन्हेगारांची एसपी राकेश ओलांना सलामी

नव्याने पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार राकेश ओला यांनी हाती घेतला आहे. यापूर्वी ओला यांनी श्रीरामपूर येथे पोलिस उपअधीक्षक पदावर काम केलेले आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी त्यांनी आपली छबी निर्माण केली होती. सोनसाखळी चोरी करणार्‍या अनेक टोळ्यांचा त्यांनी बिमोड केला आहे. ते आता पुन्हा नगर जिल्ह्यात एसपी म्हणून आले आहेत. त्यांनी कार्यभार स्वीकारताच श्रीरापुरात दोन दिवसांत अनेक गुन्हे घडले आहेत. गुन्हेगारांनी त्यांना एकप्रकारे सलामी दिल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news