नगर: वाळूउपसा बोटीप्रकरणी चौघांवर गुन्हा, नेवासा पोलिसांनी केल्या 18 लाखांच्या दोन बोटी जप्त | पुढारी

नगर: वाळूउपसा बोटीप्रकरणी चौघांवर गुन्हा, नेवासा पोलिसांनी केल्या 18 लाखांच्या दोन बोटी जप्त

नेवासा, पुढारी वृत्तसेवा: महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान पीक पाहणी दौर्‍याप्रसंगी म्हाळापूर शिवारात पकडून दिलेल्या दोन बोटी प्रकरणी नेवाशातील चौघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 18 लाख रुपये किंमतीच्या या दोन बोटी जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत नेवासा खुर्दचे सर्कल सुनील भाऊसाहेब लवांडे यांनी फिर्याद दिली असून, त्यात म्हटले की, 23 ऑक्टोबर रोजी म्हाळापूर गावच्या शिवारात प्रवरासंगम ते मंगळापूर रस्त्याच्या बाजूला निवृत्ती आसाराम म्हस्के यांच्या मालकीच्या म्हाळापूर येथील गट नं. 48/2 मध्ये वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी बोट व साहित्य आढळून आले आहे. नायब तहसीलदार किशोर सानप, तलाठी भारत दत्तात्रय म्हस्के, कोतवाल निवृत्ती विठ्ठल माळी यांना घेऊन सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जाऊन पाहणी केली असता, तिथे 6 लाख रुपये किंमतीची एक लोखंडी यांत्रिक बोट आढळली. त्यामध्ये यांत्रिक इंजिन, पाईप व इतर वाळू काढण्यासाठी लागणारे साहित्य, 4 घमेले वाळू मिळाली.

दुसरी एक मोठी तीन कप्पे असलेली यांत्रिक बोट इंजिनसह आढळली. त्यात एक लोखंडी पाईप, बांगडी पीव्हीसी पाईप, 4 लोखंडी टिपाडे, 4 घमेले वाळू, असे साहित्य मिळून 12 लाख रुपये किंमत आहे. वरील दोन्ही बोटी मिळून एकूण 18 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला आहे. सदर बोट व साहित्य संदीप कचरु म्हस्के, सुनील धोत्रे, हिरामण धोत्रे, सचिन चिखले (चौघेही रा.नेवासा) यांच्या मालकीचे असल्याचे निवृत्ती आसाराम म्हस्के यांनी सांगितले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी या चौघांवर भारतीय दंड विधान कलम 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3 व 15 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे करत आहेत.

Back to top button