

नगर, पुढारी वृत्तसेवा: जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत 1 हजार 319.5 हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील 21 हजार 119 बाधित शेतकर्यांना 4 कोटी 8 लाख 97 हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला. जवळपास 96 टक्के अनुदान वितरित झाले आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्राला तडाखा बसला आहे. त्यामुळे लाखो बाधित शेतकर्यांना आता अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे.
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा अधिक शेतपिकांचे नुकसान झाल्यास शासनाच्या वतीने बाधित शेतकर्यांना अनुदान दिले जात आहे. यंदाच्या वर्षापासून अनुदान दुपटीने वाटप केले जात आहे. यंदा जिल्ह्यातील एकूण 43 गावांतील शेतपिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जून महिन्यात 8, जुलै महिन्यात 5 तर ऑगस्ट महिन्यात 13 वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जून महिन्यात अतिवृष्टीमुळे 109.99 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. जुलै महिन्यात 432.82 हेक्टर तर ऑगस्ट महिन्यात 759.99 हेक्टर शेतपिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. एकंदरीत तीन महिन्यांत जिल्ह्यातील 21 हजार 440 शेतकर्यांच्या 1 हजार 319.5 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.
या बाधित शेतकर्यांना नवीन निकषाप्रमाणे दुपटीने म्हणजे जिरायती पिकांसाठी 13 हजार 600 हेक्टर, बागायती पिकांसाठी 27 हजार तर फळबागासाठी 36 हजार हेक्टरी नुकसानभरपाई अदा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 4 कोटी 25 लाख रुपये अनुदानाची मागणी केली होती. बाधित शेतकर्यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला 4 कोटी 25 लाख 91 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला.
सप्टेंबर महिन्यात 1 लाख 35 हजार हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यात 1 लाख 81 हजार हेक्टर पिके जमिनदोस्त झाली. नुकसान भरपाई अदा करण्यासाठी शासनाकडे 287 कोटींची मागणी करण्यात आली आहे.
कोपरगाव तालुक्यात ऑगस्टपर्यंत सर्वाधिक 490. 35 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्यापोटी 1 हजार 36 बाधित शेतकर्यांच्या खात्यावर एकूण 1 कोटी 31 लाख रुपयांचे अनुदान वर्ग झाले.अकोले तालुक्यातील 432.82 हेक्टर क्षेत्राला पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे 19 हजार 317 बाधित शेतकर्यांना एकूण 1 कोटी 93 लाख 17 हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.राहुरीसाठी 43 लाख 99 हजार रुपयांचा निधी वितरित केला.