उसाच्या प्रश्नांवर शेतकरी संघटनांची काळी दिवाळी, तहसील कार्यालय आवारात खाल्ली चटणी भाकरी | पुढारी

उसाच्या प्रश्नांवर शेतकरी संघटनांची काळी दिवाळी, तहसील कार्यालय आवारात खाल्ली चटणी भाकरी

शेवगाव: निवडणुकीच्या काळात शाहू- फुले-आंबेडकर- छत्रपती शिवाजी महाराजांची नाव घेणार्‍यांनी सहकारी साखर कारखान्यांना आपल्या बापांची नावे देऊन खासगी संस्थाने निर्माण केली. त्यासाठी साखर कारखानदारांच्या विरोधात ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बसलेले भूत उतरविण्यासाठी निर्णायक भूमिका घेऊन संस्थानिकांना हद्दपार केल्याशिवाय सर्वसामान्य शेतकर्‍यांना न्याय मिळणार नसल्याने सर्व संघटनांनी एकत्र येऊन वज्रमूठ बांधण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी केले आहे.

शेवगाव येथे वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मनसे, शिवसेना, रासप, प्रहार जनशक्ती पक्ष, आम आदमी पार्टीच्या वतीने तहसील कार्यालय आवारात शेतकर्‍यांच्या उसाच्या विविध प्रश्नांवर काळी दिवाळी साजरी करण्यात आली. प्रादेशिक उपसंचालक साखर मिलिंद भालेराव यांनी संबंधित प्रश्नाबाबत साखर कारखान्यांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलक लक्ष्मीपूजन करण्यास परतले.

ऊस उत्पादन खर्च लक्षात घेता शेतकर्‍याच्या ऊसाला एफआरपी अधिक तीनशे रुपये प्रति टन जादा भाव जाहीर करावा, साखर कारखान्यांनी ठेवीच्या नावावर कपात केलेले शेतकर्‍यांच्या उसाचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावेत, साखर कारखान्याच्या कारभारात पारदर्शकता आणावी यासह विविध मागण्यासाठी शेतकरी संघटना एकवटल्या होत्या.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव अ‍ॅड. सुभाष लांडे, राज्य कार्यकारणी सदस्य संजय नांगरे, आम आदमीचे शरद शिंदे, मनसे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अ‍ॅड. अविनाश मगरे, वंचित बहुजन आघाडी महिला तालुकाध्यक्ष संगीता ढवळे, अरविंद सोनटक्के, प्यारेलाल शेख आदी सहभागी झाले होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली . याप्रसंगी झालेल्या चर्चेत प्रादेशिक उपसंचालक मिलिंद भालेराव, विशेष लेखापरीक्षक विलास सोनटक्के, केदारेश्वराचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे, गंगामाईचे प्रशासकीय अधिकारी मुखेकर, वृद्धेश्वरचे शेतकी अधिकारी अकोलकर चर्चेत सहभागी झाले होते.

Back to top button