नगर: बनावट एनओसीप्रकरणी हायकोर्टात याचिका! याचिकाकर्ते शेख यांची न्यायालयात धाव | पुढारी

नगर: बनावट एनओसीप्रकरणी हायकोर्टात याचिका! याचिकाकर्ते शेख यांची न्यायालयात धाव

नगर, पुढारी वृत्तसेवा: बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी आर्मी स्टेशन हेडक्वार्टर अहमदनगरच्या नावाने बनावट एनओसी तयार करून नगर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

बनावट एनओसीप्रकरणात दाखल गुन्ह्यात याचिकाकर्ते शाकीर शेख यांचा जबाब नोंदवून घ्यावा. तसेच तपासासाठी त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे रेकॉर्डवर दाखल करून घ्यावीत असे आदेश न्यायालयाने तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांना दिले आहेत. न्यायमूर्ती मंगेश पाटील व अभय वाघवासे यांच्या समोर सुनावणी पार पडली.

लष्कराच्या हद्दीलगतच्या बांधकाम परवानगीसाठी उपविभागीय कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या दाखल्यांपैकी काही दाखले बनावट असल्याचे समोर आले आहे. बबन भागचंद बेरड (रा. भिंगार ता.नगर), आमीर तकी मिर्झा (रा. मुकुंद नगर) व निलेश प्रेमराज पोखर्णा व इतर 5 जणांच्या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करून उपविभागीय कार्यालयाची फसवणूक झाल्याची फिर्याद महसूल सहाय्यक संजय गोलेकर यांनी दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपअधीक्षक अनिल कातकाडे याचा तपास करत आहेत. या प्रकरणी शाकीर शेख हे दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. पोलिसांकडून केवळ तीनच प्रकरणात तपास सुरू आहे. इतरही अनेक प्रकरणात बनावट एनओसी देण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, शेख यांनी उच्च न्यायालयात क्रिमिनल रीट पीटिशन दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये शाकीर शेख यांचा जबाब नोंदवून घ्यावा. त्यांच्याकडे असलेली इतर एनओसी बाबतची कागदपत्रे व पुरावे रेकॉर्डवर घेऊन त्या दृष्टीने तपास करावा, असे आदेश न्यायालयाने तपासी अधिकार्‍यांना दिले आहेत.

मूळ आरोपींपासून पोलिस दूरच?

उपविभागीय कार्यालयाकडून फिर्याद दाखल करत असताना मूळ आरोपींना वाचवून अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद देण्यात आल्याप्रकरणी शाकीर शेख यांनी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या विरोधात महसूल विभागाच्या अवर सचिवांकडे तसेच विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. विभागीय आयुक्त कार्यालयाने याची दखल घेत 25 ऑक्टोबरपर्यंत स्वयंस्पष्ट अहवाल अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

सीबीआयकडे तक्रार

दरम्यान बनावट एनओसी संदर्भात 1.30 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले असून, याबाबत पोलिसांकडून तपास होत नसल्याने शाकीर शेख यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे तक्रार केली आहे.

Back to top button