

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : जालना येथून ज्वारीच्या 400 बॅगा भरून पुण्याकडे जाणारा मालट्रक दोन मोटारसायकलवर आलेल्या चौघांनी अडविला. त्यानंतर ट्रक चालकाला मारहाण करत धान्य भरलेला मालट्रक पळवून नेला. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावर इमामपूर घाटाच्या वर घडली. यासंदर्भात मारुती चंद्रकांत जाधव (रा.शिवनेरीनगर, कोंढवा, ता.हवेली, पुणे) यांनी शुक्रवारी (दि.21) सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जाधव हे ट्रकचालक असून, ते जालना येथून ट्रकमध्ये (क्र.एमएच 12 डीटी 4433) ज्वारीच्या 400 बॅगा भरून औरंगाबाद मार्गे पुण्याकडे जात होते.
शुक्रवारी (दि.21) पहाटे 2.30 च्या सुमारास ते नगर-औरंगाबाद रोडने पांढरीपुलाच्या पुढील इमामपूर घाट चढून वर आले. त्यांच्या पाठीमागून दोन मोटारसायकलवर चार अनोळखी इसम आले. त्यांनी रोडच्या कडेला असलेल्या बाबा पेट्रोल पंपाजवळ दोन्ही मोटारसायकली आडव्या लावून ट्रक अडविला. त्यातील दोघांनी मालट्रकमध्ये चढून चालक जाधव यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यांचे डोळे, हात-पाय व तोंड कापडाने बांधून त्यांना ड्रायव्हर सिटच्या पाठीमागे ढकलून दिले.
त्यांच्या खिशातील 4 हजार 500 रुपयांची रोकड, तसेच मोबाईल काढून घेतला. एक जण ट्रक चालविण्यासाठी बसला, तर एक जण चालक जाधव यांच्या अंगावर बसला. त्यानंतर ट्रक पुन्हा पाठीमागे नेवाशाकडे नेला. नेवासा तालुक्यातील कुकाणा गावाजवळ रस्त्याच्या कडेला चालक जाधव यांना गाडीतून खाली फेकून देत, ते चोरटे ट्रक घेऊन पसार झाले. त्यानंतर काही नागरिकांच्या मदतीने ट्रक चालक मारुती जाधव हे दुपारी नगरमध्ये आले व त्यांनी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार सांगून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.