कर्ज वसुलीत पाथर्डी तालुका जिल्ह्यात दुसरा : आमदार मोनिका राजळे | पुढारी

कर्ज वसुलीत पाथर्डी तालुका जिल्ह्यात दुसरा : आमदार मोनिका राजळे

करंजी : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असला तरी या तालुक्यातील शेतकरी प्रामाणिक असून, दरवर्षी सेवा संस्थेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करीत आहेत. त्यामुळे शंभर टक्के कर्जवसुली होत असून पाथर्डी तालुका कर्ज वसुली जिल्ह्यात दुसर्‍या स्थानी आहे.  तिसगाव सेवा संस्थेच्या पारदर्शक कारभारामुळे ही संस्था तालुक्यात नावारोपाला आली असून शेतकर्‍यांना 15 टक्के लाभांश वाटप करून संस्थेने पारदर्शक कामाचा लेखाजोखा या माध्यमातून मांडला असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे. तिसगाव सेवा संस्थेच्या माध्यमातून सभासदांना लाभांश वाटप व दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

या प्रसंगी आमदार राजळे बोलत होत्या. यावेळी जि. प. माजी सदस्य पुरुषोत्तम आठरे, प. स. माजी सदस्य सुनील परदेशी, युवानेते कुशल भापसे, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल रांधवणे, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, चेअरमन चारुदत्त वाघ, ज्येष्ठ नेते अहमदभाई शेख, दगडूभाई तांबोळी, शंकरराव कातखडे, भाऊसाहेब लोखंडे, सुरेश चव्हाण, गहिनीनाथ खाडे, दत्तू मराठे, बापूसाहेब घोरपडे, निर्मला नरवडे, चेअरमन बाळासाहेब लवांडे, व्हाईस चेअरमन आरिफ तांबोळी, माजी चेअरमन भारत गारुडकर, उपसरपंच इलियास शेख, शिवसेना विभाग प्रमुख पंकज मगर, उपस्थित होते.

कर्डिले म्हणाले, जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून सेवा संस्थांसह साखर कारखान्यांना आर्थिक मदत करून शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार रुपये देऊन त्यांना मदतीचा हात दिला. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर लगेच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना पन्नास हजार रुपयांची कर्जमाफी केली. राज्यात अतिपावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकार देखील शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. त्यांना नुकसान भरपाई दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जि. प. माजी सदस्या संध्या आठरे व पं. स. माजी सदस्य सुनील परदेशी यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 64 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक नंदकुमार लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब शेलार यांनी केले. आभार पै. आरिफ तांबोळी यांनी मानले.

विकासकामांचा तुम्ही हिशेब द्या, आम्हीही देतो
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर निशाणा साधत कर्डिले म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी तुमचे सरकार आले. त्यावेळी आम्ही मंजूर केलेला निधी तुम्ही रद्द केला. त्यामुळे तुम्ही जे पेरलं तेच उगणार. तुम्ही सरकारच्या नावाने बोट मोडू नका. अडीच वर्षात किती विकास केला, याचा हिशेब द्या. आम्ही किती विकास केला, याचाही आम्ही हिशेब द्यायला तयार आहोत, असेही आव्हान कर्डिले यांनी दिले.

Back to top button