घोडेगाव कांदा मार्केट रुतलेय गाळात ! कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न मिळूनही नेवासा तालुका बाजार समितीचे अक्षम्य दुर्लक्ष | पुढारी

घोडेगाव कांदा मार्केट रुतलेय गाळात ! कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न मिळूनही नेवासा तालुका बाजार समितीचे अक्षम्य दुर्लक्ष

सोपान भगत : 

कुकाणा : राज्यात कांदा विक्रीसाठी पहिल्या क्रमांकाचे असलेले घोडेगाव कांदा मार्केट अक्षरशः गाळात रूतले आहे. कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न मिळत असूनही, नेवासा तालुका बाजार समितीचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दररोज हजारो टनांची उलाढाल होत असलेल्या या परिसरात व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचे पाय चिखलात रुतत असल्याने, त्याचा परिणाम उलाढालीवर होत आहे. नेवासा बाजार समितीच्या व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेवासा बाजार समितीचा घोडेगाव हा उपबाजार असून, या ठिकाणी 19 वर्षांपूर्वी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून कांदा मार्केट सुरू करण्यात आले. मार्केट सुरू करण्यापूर्वी येथे असलेला म्हशींचा बाजार राज्यातच नव्हे, तर देशात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी नगर जिल्ह्यासह औरंगाबाद, बीड, सोलापूर, पुणे जिल्ह्यातून शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी घेऊन येतात. या कांदा मार्केटमध्ये आठवड्यातून तीन वेळा कांद्याचे लिलाव केले जातात. प्रत्येक लिलावाच्या दिवशी येथे पाचशे ते सहाशे ट्रक कांदा शेतकर्‍याकडून उतरविण्यात येतो. एकाच दिवसात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार या मार्केटमध्ये केला जातो आणि यातूनच कोट्यवधी रुपये नफा हा बाजार समितीला देखील मिळतो.

परंतु, एवढ्या मोठ्या नफ्याच्या तुलनेने येथील बाजार समितीकडून येणार्‍या शेतकर्‍यांची कुचंबना केली जाते. या मार्केटमध्ये शेतीमाल घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांचे अतिशय हाल होताना दिसतात. बाहेर गावाहून येणार्‍या शेतकर्‍यांची ना खाण्याची, ना पिण्याची, ना राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. विशेष म्हणजे हे कांदा मार्केट अक्षरश: चिखलामध्ये भरते. येथील कुठल्याही दुकानात चिखल व दलदल तुडवतच जावे लागते. प्रवेशद्वारातूनच येणार्‍या शेतकर्‍याचे दलदलीने स्वागत केले जाते. चप्पल तर पायात घालण्याचा प्रश्नच येथे येत नाही. संपूर्ण परिसरात गाळ असल्याने शेतकर्‍यांना पायात घातलेली चप्पल त्याच गाळामध्ये सोडून देण्याची वेळ येते. साचलेल्या गटारीप्रमाणे या मार्केटची अवस्था झालेली आहे.

गेल्या सोळा ते सतरा वर्षांत या बाजार समितीला एवढे मोठे उत्पन्न मिळाले असताना देखील येथील परिस्थिती का सुधारली नाही, हाच खरा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. आपला घाम गाळून, कष्ट करून शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकविलेला कांदा आपला संसार चालविण्यासाठी, मुलाबाळांचे शिक्षण करण्यासाठी, आपल्या फाटक्या तुटक्या कपड्याने आपला शेतीमाल विक्रीसाठी आणतो. त्याच ठिकाणी बळीराजाला मनस्ताप सहन करण्याची वेळ येते. ही गोष्ट मात्र लाजिरवाणी असल्याचे या समितीवर काम करणार्‍या व्यवस्थापनाला वाटत नाही का? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून केला जात आहे.

उपाययोजना करण्यास प्रशासक हतबल
धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार हे कार्यकारी मंडळाला असल्याने, तसेच सध्या कार्यकारी मंडळ अस्तित्वात नसल्याने कुठलेही धोरणात्मक निर्णय आपण प्रशासक या नात्याने घेऊ शकत नाही, अशी हतबलता बाजार समितीचे प्रशासक गोकुळ नांगरे यांनी व्यक्त केली. वरिष्ठांकडून तशा सूचना आल्यास त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव पाठविला
मागील काही दिवसापूर्वी नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारातील संपूर्ण परिसरात काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव पणन संचालक पुणे यांना मंजुरीसाठी पाठविला आहे. सदर प्रस्तावाच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून, मंजुरी मिळताच पुढील कार्यकारी मंडळ अस्तित्वात येताच काँक्रिटीकरणाच्या कामास प्रारंभ होणार असल्याचेे बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले.

आमदारसाहेब, कांदा मार्केटकडे लक्ष द्या!
आमदार शंकरराव गडाख यांनी तालुक्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून, विकास केला आहे. त्यांनीच आता कांदा मार्केटच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळ्यात मार्केटमध्ये शेतकर्‍यांचे खूप हाल होतात. बाजार समिती पदाधिकारी काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगतात. परंतु, प्रत्यक्ष काम कधी होणार, असा सवाल उस्तळ खालसा येथील शेतकरी बाळासाहेब पवार यांनी केला आहे.

Back to top button