

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात गुरुवार (दि.20) पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातले. शेतकर्यांची दाणादाण, तर ओढे, नाले, नद्यांना महापूर आला. त्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला, तर अनेक तलाव धोक्याची पातळी ओलांडली, तर तलाव ओसंडून वाहत होते. जेऊर पट्ट्यात तर पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला. नगर तालुक्यातील मजले चिंचोली, उदरमल, सोकेवाडी, केवाडी, खोसपुरी पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सर्वत्र पाणीच पाणी होते. शेतकर्यांचे सोकांदा, कांदा, कांद्याचे रोप व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जेऊर येथील सीना, खारोळी नदीला महापूर आला.
तत्काळ पंचनामे करण्याची मागणी
नगर तालुक्यातील जेऊर पट्ट्यात, तसेच तालुक्यातही सर्वच शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे जनजीवन विस्कळीय झाले. झालेल्या नुकसानीची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्यात यावेत, शेतकर्यांना मदत मिळावी, अशी मागणी इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे, पांगरमल सरपंच बाप्पूसाहेब आव्हाड, डोंगरगण उपसरपंच संतोष पटारे, धनगरवाडी सरपंच शुभांगी शिकारे, बहिरवाडी सरपंच अंजना येवले, ससेवाडी सरपंच चांगदेव ससे आदींनी केली.
दक्षता घेण्याचे आवाहन
नगर तालुका, तसेच जेऊर पट्ट्यातील सर्वच बंधारे, तलाव तुडूंब भरलेले आहेत. नदीकाठावर राहणार्यांना दक्षता घेण्याचे आवाहन महसूल विभागातर्फे तहसील उमेश पाटील, मंडळाधिकारी वृषाली करोसिया, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी केले.
हे तलाव झाले ओव्हरफ्लो
जेऊर येथील डोणी तलाव, इमामपूर येथील पालखी तलाव, महादेव रस्ता उपळाचा तलाव, बहिरवाडी येथील वाकी तलाव, पिंपळगाव माळवी तलाव, कापूरवाडी, भोरवाडी, धोंडेवाडी, वडगाव तांदळी, देऊळगाव, गुंडेगाव, मजले चिंचोली येथील गायमुख तलाव, जेऊर येथील शेटे वस्ती तलाव, कामरगाव तलाव, चिचोंडी पाटील येथील केळ नदीवरील तलाव, ऐतिहासिक भातोडी तलाव.
तालुक्याशी या गावांचा तुटला संपर्क
इमामपूर गाव ते पाटोळे खारोळी (खारोळी नदी)
नगर औरंगाबाद महामार्ग ते वांबोरी रस्ता (सीना नदी)
पांगरमल ते मिरी रस्ता
करंजी ते पांढरीपुल रस्ता
जेऊर ते चापेवाडी रस्ता
चिचोंडी पाटील ते दौलावडगाव रोड (गराडे वस्ती, मेहेकरी नदी)