अकोले : बनावट खतांची विक्री; कृषी केंद्र चालकावर गुन्हा | पुढारी

अकोले : बनावट खतांची विक्री; कृषी केंद्र चालकावर गुन्हा

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लिंगदेव येथील कृषी केंद्रातून शेतकर्‍यास बनावट खत विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांत ‘आर्द्रतो अ‍ॅग्रो फार्मस इंडिया’ या नावाच्या कृषी सेवा केंद्राचे मालक आशुतोष ठका शेटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंगदेव येथील आशुतोष ठका शेटे यांच्या दुकानातून शेतकरी सोमनाथ अंकुश चौधरी यांनी 10ः 26ः 26 खत घेतले. या खताबाबत त्यांना शंका आली. यासंदर्भात त्यांनी कृषी अधिकारी यांच्याकडे संशय व्यक्त केला. कृषी अधिकार्‍यांनी ते खत न वापरता तसेच ठेवण्यास सांगितले.

रविवारी (दि. 16) रोजी तालुका कृषी अधिकारी माधव हासे हे शेतकरी सोमनाथ अंकुश चौधरी यांचे घरी गेले. त्यांनी खताची गोणी पाहिली असता ते बनावट असल्याची शंका आली. कृषी अधिकार्‍यांनी चौधरी यांना खताच्या बिलाची मागणी केली. त्यावेळी त्यांनी आर्द्रतो अ‍ॅग्रो फार्मस इंडिया पी.व्ही.टी. लि. यांचे बिल दाखवले. त्या बिलावर 10ः 26ः 26 या खताचे पुढील पक्क्या बिलावर नोंद न करता पाठिमागे पेनने लिहिलेले होते. कृषी अधिकार्‍यांचा संशय बळावल्याने त्यांनी दुकानदार आशुतोष ठका शेटे यांना सोमनाथ चौधरी यांचे घरी बोलावुन घेतले. खताबाबत विचारपुस केली असता तो उडवा- उडवीचे उत्तर देवू लागला. त्यामुळे सदर खताचे गोणीचा पंचनामा केला.

खतामधून अंदाजे 400 ग्रॅम वजनाचे तपासणी करता सॅम्पल वेगवेगळे काढून गोणी सील केली. खताचे सॅम्पल पुणे येथील प्रयोग शाळेत पोस्टाने पाठवून दिले. पंचायत समितीचे तालुका कृषीअधिकारी सचिन देवराम कोष्टी यांच्या फिर्यादीवरून दुकानदार आशुतोष ठका याच्या विरोधात अत्यावश्यक वस्तु सेवा अधिनीयमाचे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे करीत आहेत.

शेतक.र्‍यांना आवाहन
लिंगदेव येथील आर्द्रतो अ‍ॅग्रो फार्मस इंडिया या नावाच्या कृषी सेवा केंद्रात बोगस खताचे प्रकरण आढळून आले. त्यासंदर्भात रासायनिक खत आदेश 1985 तर अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकर्‍यांची कृषी सेवा केंद्राकडून फसवणूक झाल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच बनावट खते, बियाणे विक्री करणार्‍यांबाबत शेतकर्‍यांनी संपर्क साधावे, असे आव्हान जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक किरण मांगडे यांनी केले आहे.

Back to top button