

नगर : पुढारी वृत्तसेवा : महासभेसाठी नगरसेवकांवर समोर ठेवलेल्या माईकचा आवाज 'लो' झाल्याने नगरसेवक मनोज कोतकर यांनी माईक जमिनीवर आपटला. त्यानंतर खासगी रुग्णालयात मृत्यू झालेल्या बाहेरगावच्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी महापालिकेने परवानगी देऊ नये, डेंग्यू रुग्ण यासह अन्य प्रश्नांवरूनही महासभेत गदारोळ झाला. नगरसेवकांनी महासभेत प्रशासनावर आरोपाचे फटाके फोडल्याने सभेत गरमागरमी झाली. कामे होत नसतील तर आम्ही सभेला येणार नाही, असा इशारा नगरसेवकांनी महापौर, आयुक्तांना दिला. महापालिकेची सर्वसाधारण सभा राजमाता जिजाऊ सभागृहात महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव शहाजान तडवी व्यासपीठावर उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीलाच नगरसेविका मनिषा बारस्कर यांनी प्रभाग एकमधील रस्त्याची दुरवस्था झाल्याचे फलक महापौर व आयुक्तांना दाखविले. जुना पिंपळगाव रस्ता प्रचंड खराब झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.शाळेत जाताना विद्यार्थ्यांच्या अंगावर चिखल उडतो अथवा खड्यात पडल्यानंतर अंगावर पाणी उडते. त्यामुळे मुलं बॅगेत अतिरिक्त ड्रेस नेतात. याच विषयावर नगरसेवक डॉ. सागर बोरूडे यांनीही जाब विचारला. यावर शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सावेडी उपनगरातील रस्त्यांची वस्तुस्थिती सभागृहात मांडली. जुना पिंपळगाव रस्ता मुरूम टाकण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, रस्त्यावरील खड्डा अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. प्रशासन किती दिवस नागरिकांच्या जीवाशी खेळणार आहे, असा प्रश्न नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी उपस्थित केला. सभागृहनेते अशोक बडे यांनी वारंवार पाठपुरावा करूनही मुरूमाचा एक डंपरही मिळत नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी निधीअभवी ही सर्व काम रखडली होती. मात्र, निधीची पुर्तता करून येत्या आठ दिवसांत मुरूमाची व्यवस्था करण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, सावेडी नाका ते पाईपलाईन रोड मंजूर असतानाही काम होत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही त्याचा उपयोग होत नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यावर प्रभारी शहर अभियंता इथापे म्हणाले, त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. याबाबत कार्यवाही केलेली आहे. मात्र, तत्पूर्वी सावेडी नाक्यावरील मोठा खड्डा बुजविण्यात येईल. केडगाव देवी रोडवरील जोशी यांच्या जागेबाबत तत्काळ निर्णय घेऊन तो रस्ता खुला करावा, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी केली.
स्थायी सभापती कुमार वाकळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर इथापे म्हणाले, पुतळ्यासंदर्भात पोलिसांनी एनओसी दिली आहे. कला संचानलयानेही पुतळ्याची पाहणी केेली आहे. लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
दरम्यान, नगरसेवक गणेश कवडे यांनी खासगी रुग्णातील बाहेरगावच्या मृतदेहावर अमरधाममध्ये अंत्यविधी करून देऊ नये अशी मागणी केली असता नगरसेवकांनी त्याला विरोध दर्शविला. त्यावेळी नगसेवक कवडे आणि अन्य नगरसेवकांची शाब्दिक चकमक झाली.
तर, त्यावेळी नगरसेवक मनोज कोतकर यांनी आवाज येत नसल्याने माईक जमिनीवर आपटला. त्यावेळी उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यासपीठावरून उठून माईकचा ताबा घेत नगरसेवकांना शांत केले.
दहा कोटी कुठे गेले? बोराटे यांचा सवाल
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या मूलभूत निधीतून मुख्य शहरातील रस्त्यांसाठी दहा कोटींचा निधी दिला होता. तो निधी कुठे गेला असा प्रश्न उपस्थित करीत सार्वजनिक बांधकामची ती निविदा रद्द करा अशी मागणी नगरसेवक बोराटे यांनी केली. त्यामुळे त्याच रस्त्यावर दुसर्या निधीतून कामही करता येत नाही, असे नगरसेवक अविनाश घुले म्हणाले. त्यावर अभियंता इथापे म्हणाले, शासनाने निधी दिला मात्र, कार्यन्वित यंत्रणा म्हणून तो निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला. बांधकाम विभागाकडून टेंडर प्रक्रिया झाली. त्या निधीतून उपनगरामध्ये काही कामेही झाली. शहरातील मोहरम आणि गणपती विसर्जन मिरवूणक मार्ग रखडला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकामकडे पाठपुरावा केला आहे. ठेकेदार वाढीव निधी मागत आहे. पण ते शक्य नाही. यावर लवकरच महापौर कार्यालयात बैठक बोलविण्यात येईल.
प्रोफेसर कॉलनी चौकात ढाबे टाकलेत का?
नगरसेवक महेंद्र गंधे यांनी प्रोफेसर कॉलनी चौकातील मनपाच्या गाळेधारकांनी रस्त्यावर ढाबे टाकलेत का असा सवाल उपस्थित केला. साडेचार कोटींचा खर्च करून रस्त्याची वाट लागली आहे. कचर संकलनामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. त्यावर तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्यावर उपायुक्त यशवंत डांगे म्हणाले, कचर्याचा वास येणार नाही अशी व्यवस्था करण्यात येईल.