नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेला स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, मनपातच दर्शनी भागात भंगाराचा ढीग साचला आहे. राजमाता जिजाऊ सभागृहाच्या समोरील जिन्यात जुन्या वस्तूंचा ढीग असून, त्या महासभेसाठी येणार्या नगरसेवकांचे तो स्वागत करणार आहे, असे चित्र मनपात आहे. मनपाला स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कारांच्या निधीतून मनपा हद्दीत अनेक उपक्रमही राबविण्यात आले आहेत. उपमहापौर गणेश भोसले प्रत्येक आठवड्याला विविध प्रभागात जाऊन स्वच्छतेचा उपक्रम राबवितात. या उपक्रमामध्ये उपमहापौर, नगरसेवक, उपायुक्त आणि मनपा कर्मचारी सहभागी होतात. प्रत्येक प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरसेवक व पदाधिकार्यांचा प्रयत्न असतो. मात्र, महापालिकेच्या मुख्यालयाचत जुन्या साहित्यांचा ढिगारा अगदी दर्शन भागातच पडलेला आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही.
दोन दिवसांपूर्वी महापौर दिवसभराचे काम आटोपल्यानंतर महापालिकेतून बाहेर पडताना राजमाता जिजाऊ सभागृहाबाहेरील जिन्यामध्ये त्यांना जुन्या खुर्च्या, फॅन व विविध वस्तूंचा ढिगारा पडलेला त्यांना दिसला. महापौरांनी तत्काळ कर्मचार्यांना बोलावून तेथील जुन्या वस्तू उचलून बाजूला ठेवण्यास सांगितले. परंतु, महापौरांनी सांगूनही कर्मचारी त्या वस्तू उचलल्या नाहीत. एकप्रकारे महापौरांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. बुधवारी महासभा होणार आहे. महापौरांनी सांगूनही कर्मचार्यांनी जिन्यातील साफसफाई केली नाही. त्यामुळे या जुन्या वस्तू पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवकांचे स्वागत करताना दिसणार आहेत.