पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : वृद्धेश्वर साखर कारखान्याने यावर्षीच्या गाळप हंगामात साडेसहा लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, साडेसात लाख क्विंटल साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. गुणवत्तापूर्ण हंगाम यशस्वीतेसाठी वृद्धेश्वरचे प्रयत्न राहणार आहेत, कार्यक्षेत्रात यावर्षी पूरक उसाची उपलब्धता आहे. मशिनरीत अद्ययावत सुधारणा केल्याने प्रतीदिन गाळपाचा वेग वाढणार आहे, असे प्रतिपादन संचालक राहुल राजळे यांनी केले. वृद्धेश्वरच्या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ज्येष्ठ संचालक सुभाष बुधवंत व मीराबाई बुधवंत या दाम्पत्याच्या हस्ते विधीवत गव्हाणपूजा करून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वृध्देश्वरचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे होते. तर, आमदार मोनिका राजळे, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार, वृध्देश्वरचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, डॉ.यशवंत गवळी, साहेबराव सातपुते, बाबासाहेब किलबिले, कुशीनाथ बर्डे, विष्णूपंत अकोलकर, अनिल बोरुडे सुधाकर भवार, गंगानाना शिंदे, दत्तात्रय मराठे व्यासपीठावर उपस्थित होते.
राहुल राजळे म्हणाले, यावर्षी सभासद जनता अपघात विम्याच्या रकमेत वाढ करून 25 हजार रूपयांवरून 50 हजार रुपये केली. एफआरपीनुसार ऊस दरात येणारी फरकाची रक्कम नुकतीच शेतकर्यांच्या बँक खाती जमा केली आहे.सभासदांच्या ठेवींवरील व्याजाची रक्कम दिवाळीपूर्वी अदा केली जाईल. यावेळी जेष्ठ संचालक उद्धवराव वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आप्पासाहेब राजळे यांनी कामगारांना बारा टक्के दराने दिवाळी बोनस देणार असल्याची घोषणा केली. कार्यक्रमास कारखाना अधिकारी आर.जे.महाजन, जे. आर. पवार, विनायक म्हस्के, माजी पं. स. सदस्य सुनील ओव्हळ, सरपंच बाबासाहेब चितळे, सचिन नेहुल, भाऊसाहेब उघडे, बँक अधिकारी सुरेश आढाव, सुनील ओव्हळ, संभाजी राजळे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी सभासद प्रसंगी मोठ्या संख्येने हजर होते. प्रास्ताविक सुभाषराव ताठे यांनी, सूत्रसंचालन सरव्यवस्थापक भास्करराव गोरे यांनी केले. संचालक बाळासाहेब गोल्हार यांनी आभार मानले.