नगर : गिफ्ट आर्टिकलच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त ! | पुढारी

नगर : गिफ्ट आर्टिकलच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त !

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यासमोरील गिफ्ट आर्टिकलच्या दुकानातून घातक शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. दोन मोठ्या तलवारींसह 21 घातक शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. फेसबुक पोस्टवरून शस्त्रे विक्रीस असल्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दुकानावर छापा टाकून ही कारवाई केली.
हुमायू उर्फ मयूर शेख (रा. आशा टॉकीज चौक, नगर), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यातील संवेदनशील ठिकाणी शस्त्रांची विक्री व वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा ठिकाणांमध्ये अहमदनगर व संगमनेरचा समावेश आहे. मात्र, असे असतानाही चक्क कोतवाली पोलिस ठाण्याच्या समोरच एका गिफ्ट आर्टिकलच्या दुकानातून घातक शस्त्रांची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. या दुकानातून शस्त्रांची विक्री होत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर मंगळवारी (दि.18) दुकानाची झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान, तलवारींसह, गुप्त्या, चाकू असा शस्त्रसाठा दुकानात आढळून आला.

कोणताही परवाना नसताना शस्त्रांची विक्री होत होती. पोलिसांनी आरोपीला अटक करून दुकानात विक्रीसाठी ठेवलेला शस्त्रसाठा जप्त केला असून दुकान सील केले आहे. पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, विवेक पवार, उपनिरीक्षक मनोज कचरे, हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे, पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button