संगमनेर : थोरात कारखान्याकडून सर्वाधिक 2,626 भाव : आमदार बाळासाहेब थोरात | पुढारी

संगमनेर : थोरात कारखान्याकडून सर्वाधिक 2,626 भाव : आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने गेल्या वर्षी कार्यक्षेत्रात ऊसउत्पादकांना 2,450 रुपये प्रतिटन भाव दिला होता. यंदा 176 रुपये प्रतिटन वाढ करून 2,626 रुपये उसाला भाव देणार असल्याची घोषणा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी केली. दरम्यान, जिल्ह्यात यंदाही सर्वाधिक भाव देण्याची परंपरा थोरात साखर कारखान्याने कायम राखल्याचे दिसत आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या 56 व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी आ. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ होते.

यावेळी आ. डॉ सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, रणजित देशमुख, अ‍ॅड. माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजित थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. हसमुख जैन, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, रमेश गुंजाळ, सुभाष सांगळे, व्हा. चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, 56 वर्षांपूर्वी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी काटकसरीने सुरू केलेल्या या साखर कारखान्याची घडी सर्वांनी जपली. गेल्यावर्षी साखर कारखान्याने 15 लाख 53 हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले. यात सर्वांचे योगदान आहे, हे नाकारून चालणार नाही, असे सांगत आ. थोरात म्हणाले, यंदा संपूर्ण तालुक्यात सर्वत्र पाऊस चांगला झाला. त्यामुळे येथून पुढे एक ते दीड वर्ष पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे चित्र आहे.

निळवंडे कालव्यांची कामे पूर्णत्वास आली आहेत. या दिवाळी पाडव्याला कालव्यांना पाणी सोडण्याचे स्वप्न होते. मात्र, सरकार बदलले. त्यामुळे थोडावेळ लागेल, पण आता निळवंडेचे पाणी कोणीही अडवू शकणार नाही, असे आ. थोरात म्हणाले. गेल्या वर्षी 10 लाख 80 हजार क्विंटल साखर निर्यात केली. 1 लाख टन साखर विक्रीस सज्ज आहे. मात्र, केंद्र सरकारने साखरेला प्रतिक्विंटल 3500 रुपये भाव देणे गरजेचे आहे, परंतु अजूनही साखरेला 3100 चाच भाव मिळत असल्याचे ते म्हणाले.

कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहळ म्हणाले, दिवसेंदिवस गळीत कमी होत आहे. त्यामुळे हाय रिकव्हरी असणारा ऊस मिळविण्याचा कारखाना प्रशासनाचा प्रयत्न आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी मानले.

असा पिकला हशा..!
थोरात कारखान्याला मिळालेला केंद्रस्तरावरील पुरस्कार स्वीकारण्यास अध्यक्ष प्रतापराव ओहोळ हे शिर्डीवरून दिल्लीला विमानाने गेले अन् आलेसुद्धा विमानानेच, मात्र त्यांचे वजन जास्त असल्यामुळे विमान उतरण्यास अनेक अडचणी आल्या अन् ते विमान थेट मुंबईला उतरले, असे आपल्या कारखान्याचे वजनदार अध्यक्ष आहे, त्यांचे कामगिरीही वजनदार आहे, असे माजी मंत्री, आ. बाळासाहेब थोरात म्हणताच हशा पिकला.

संगमनेर दूध संघ देणार 36 रुपये प्रतिलिटर दर
कोरोना संकटाच्या काळात संगमनेर तालुका दूध संघाने दूध उत्पादकांना मदत केली. दूध संघाकडून प्रतिलिटर 35 रुपये भाव दिला जात होता. मात्र, त्यात दूध संघाने 1 रुपयाची भर टाकली. त्यामुळे सोमवारपासून दुधाला प्रतिलिटर 36 रुपये दर देणार असल्याची घोषणा माजी मंत्री, आ. बाळासाहेब थोरात व दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख यांनी केली.

Back to top button